डॉ. मनीष दोशी राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)
*****************
खर तर तुम्हाला सांगायची गरज नाही
डॉ.मनीष, हे एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे
एक वेगळेच रसायन आहे
पण प्रसंगवशात आणि मैत्रीच्या प्रेमाखातर
थोडी उजळणी करतो
मनीष ला भेटले पाहिले अन
त्याच्याशी बोलले म्हणजे
मनाला डोळ्याला कानाला
त्याचे वेगळेपण जाणवते राहते
त्याची एक छाप मनावर पडते .
ते व्यक्तिमत्व, जणू काही म्हणत असते
तुम्ही माझ्याशी मैत्री करू शकता .!!....
हवेतर तुम्ही
माझ्याशी वैरही करू शकता.
पण तुम्ही मला टाळू शकत नाही ;
माझ्यापासून पळू शकत नाही .
कदाचित मी तुम्हाला आवडू शकेल
कदाचित न आवडू शकेल
पण तुम्ही मला नाकारू शकत नाही.
कदाचित माझे म्हणणे तुम्हाला पटू शकेल
अथवा पटू शकणारही नाही
पण ते चूक आहे
असे तुम्ही म्हणू शकणार नाही.
या आगळ्यावेगळ्या,आणि
दुर्मिळ व्यक्तिमत्वाच्या
तुम्ही जितके जवळ जाल
तितके तुम्हाला कळून चुकेल की
हा एक लखलखता हिरा आहे
या हिऱ्याला आहेत असंख्य पैलू
त्याला आपण जेवढे नीट निरखून पाहू
तसे ते गुण आपल्याला दिसू लागतात
मनीष च्या सोबत राहू लागल्यावर
त्याची मते आणि विचार कळू लागल्यावर
त्याचाशी चर्चा करू लागल्यावर
कळले, की त्याने असंख्य गोष्टींचा
अत्यंत तर्कशुद्ध, सूक्ष्म आणि प्रामाणिक
अभ्यास केलेला आहे.
डॉक्टर म्हणून
मनीष बद्दल काय बोलू,
तो माझा अत्यंत आवडता "डॉक्टर साथीदार "आहे
कॅज्युलटीत आणि ओपीडीत तो माझा पार्टनर
असायचा.
त्याचे सूक्ष्म निरीक्षण, अचूक निदान
आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ,हे गुण वादातीत आहेत.
कारण कुठलीही एमर्जन्सी
हाताळायला लागणारे ; वैद्यकीय ज्ञान
आणि updated त्याच्याकडे असायचे.
अन् सर्व emergency procedure
तो सहज पणे करायचा
त्यामुळे तो सोबत असेल तर
कुठलाही रुग्ण
कुठलीही आणीबाणी आली तरी
टेन्शन यायचे नाही
तो कधीशब्दात बोलला नसेल
पण रुग्णसेवा ही परमेश्वर सेवां केल्यागत करायचा
एमटीआगरवालच्या त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे
ए मो आणि सीएमओ जोड्या
वर्षानवर्षं फिक्स असायच्या
माझ्या अगोदर मनीष चा पार्टनर
डॉ शरद पिचड होता.
पण त्याचे प्रोमोशन झाले
व सुदैवाने मी मनीष सोबत गेलो.
(किंबहुना या एका आवडत्या मित्रांने
दुसरा आवडता मित्र गाठून दिला. )
हे मैत्रीचे मोठे उपकारच आहेत.
तर अग्रवाल हॉस्पिटलमध्ये
मनीष बहुतेक करून कॅजुल्टी नाईट करत असे
आणि मी एममो ड्युटी करत असे
या ड्युटीचा एक फायदा म्हणजे
रात्री पेशंट कमी झाल्यावर
मनीषबरोबर खूप वेळ बोलायला मिळत असे
आणि त्या चर्चा खुपच गहन
आणि विचारांना चालना देणाऱ्या असायच्या
त्यातून एक विलक्षण समाधान मिळायचे
(कदाचित नंतर शांत झोप लागायला
तेही एक कारण असेल)
आणि सहकारी म्हणून त्याचे
किती कौतुक करावे
तो मदतीला सदैव तत्पर असे
एखाद्या डॉक्टरने काम केले नाही
किंवा तो ओपिडी तून उठून गेला
नंतर आला नाही
त्याची मनीषने कधीही तक्रार केली नाही
त्याने कधीही नावे ठेवली नाही .
अन् कामात हातही आखडले नाहीत
खरतर इतरांपेक्षा काकणभर अधिक काम
तो करायचा .
रुग्णालय त्याच्यासाठी विस्तृत कुटुंब होते.
त्याचे मला जाणवलेले
आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे
तो तो एक उत्तम सल्लागार आहे.
त्याचा सल्ला नेहमी तटस्थ नेमका
आणि दोन्ही बाजू चा विचार करून दिलेला असायचा.
मनीष हे चतुरस्त्र ज्ञान असलेले
बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे
त्याचे जनरल नॉलेज अफाट आहे
हिंदू अन् जैन धर्माचा व्यासंग अफलातून आहे
तत्त्वज्ञान पुराण ,ध्यान आणि धारणा वर
त्याचा अभ्यास सूक्ष्म आहे
खरच कौतुक केल्याशिवाय राहत नाही .
तो बोलू शकतो तुमच्याशी सविस्तर
रुग्णालयाच्या अडचणीवर
कामगार प्रश्नावर
वरिष्ठाच्या मर्यादावर
एवढेच नव्हे तर
समाजकारण अन राजकारणावरही
ज्याची मैत्री जीवनात वरदान आहे
असा तो मित्र आहे
असा गुणी मित्र असल्याबद्दल
मला स्वतःचा
अभिमान आणि गर्व वाटतो
मनीष बद्दल आणखी एक बोलायचे म्हणजे
त्याचे हस्ताक्षर खूपच सुंदर आहे
त्याच्या लिहिण्यात कधी गिचमिड नसते
कुठेही खडाखोड नसते .
अगदी तसेच त्याचे व्यक्तिमत्व आहे
सरळ, सुंदर, टापटीप, शिस्तप्रिय आणि देखणे !
तसेच त्याचे चारित्र्य सुद्धा
निर्लेप निर्दोष सरळ
नाकासमोर चालणारे आहे.
त्याच्याशी बोलताना जाणवते
तो एक अतिशय कुटुंब वत्सल माणूस आहे
तो एक आदर्श मुलगा आहे
आदर्श पती आहे
आणि आदर्श पिताही आहे .
शेवटी आपलं कुटुंब हेच
आपलं जीवन आणि जगणं असतं
हे सूत्र त्याला परफेक्ट कळले आहे.
त्यामुळे त्यांच्या सुखासाठी
त्याने वेचलेले अपार कष्ट डोळ्यासमोर उभे राहतात
आणि मनात कौतुक उमटते
जर देवाने माझ्यावर
काही ठराविक मित्रच सोबत ठेवायची
जाचक अट लादली तर
त्या मित्रांमध्ये मनीष चे स्थान खूप वरचे असेल यात शंकाच नाही
मनीष सारखा मित्र लाभल्याबद्दल
मी परमेश्वराचे खरंच आभार मानतो
आणि आज त्याच्या सेवापूर्ती दिनानिमित्त
त्याला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभो
ही प्रार्थना करतो
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️