सोमवार, २० जुलै, २०२६

धुनी

धुनी
*****
माय नर्मदा प्रवाही
गेला ओंडका वाहत
किती पार केली गावे
किती ओलांडले घाट 

जल गेले हरपून 
नील रत्न सागरात
परी राहिला ओंडका 
उगा लाटांशी खेळत 

काय करावे ते आता
त्याचे त्यालाही कळेना 
करी कृपा तयावर 
धाड कुठल्या अंगणा 

पृथ्वी तत्व अवघड 
नच होणार ग पाणी 
देई कृपेची ठिणगी 
तया मिळो एक धुनी 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १९ जुलै, २०२६

लालायीत

लालायित
******
तुझिया कृपेला झालो लालायीत 
म्हणून दारात उभा राही 

तुझिया प्रीतीत जाहलो आशिक 
होऊन बटिक दारी आलो

तुझिया नावाचा जाहलो व्यसनी 
म्हणून अंगणी ठाण दिले 

तुझिया प्रीतीने गेलो रे भाळून 
मन हे माळून दिले तुला 

तुझिया रूपाचे जाहले मोहन 
पाहिल्या वाचून जीव जडे 

अगा दयाघना कृपेच्या सागरा 
विक्रांत पामरा देई थारा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

वर्दी आणि प्रजा

वर्दीआणि प्रजा 
************
डरपोक प्रजा घाबरे वर्दीला 
साहेबी काठीला अजूनही ॥
अजूनही माथी गोरा तो साहेब 
करतो रुबाब बुटातला ॥
कोठडीची भीती हर एक मनात 
तयाच्या ताब्यात कायदा रे ॥
होता मर्जी खप्पा काय करतील 
कसे धरतील कोणा ठाव ॥
राहा रे लांब तयाच्या पासून 
पडो ना चुकून गाठ त्यांची ॥
जणू साडेसाती तया तावडीत 
ते नच सोडतात शनीसही ॥
एकच ती भाषा तया ऐकू येते 
अन चालवते तेच मंत्र ॥
किती फोडा टाहोआणि मारा हाका
जातात रे फुका तया विन ॥
जन मनातील चित्र हे दाहक 
सेवक भक्षक कळेचि ना ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १५ जुलै, २०२६

वाट (नर्मदा काठावरील कविता)

वाट (नर्मदा काठावरील कविता)
*******
देही सजलेली वाट मळलेली 
उधळून माती नभी दाटलेली 

तीच तीच वाट जरी पायाखाली 
हर दिन नव्या स्पर्शी भिजलेली 

कधी अचानक पायाखाली काटे 
कधी हळुवार दव ओले दाटे 

घडे जिवलग भेटी रोज इथे 
रोज अलगुज प्रेम सुरावते 

इथे कुणी कुणा आहे बांधलेले 
आकाश धरेला आहे टेकलेले 

तृप्तीत सुखाच्या जीव घे उखाणे 
अन ओठावर रोज येते गाणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, १४ जुलै, २०२६

उधारी

उधारी
*****
ठेवू नको देवा कुणाची उधारी 
माझ्या उरावरी येथे आता ॥ १

फिटू दे रे कर्ज माझे हे सव्याज 
नको देवा लाज आणू मज ॥२

कुणाच्या धनाचे कुणाच्या मनाचे 
ऋणानुबंधाचे माप नको ॥३

असो मोहमयी असू दे लाघवी 
कारणे आघवी येरझारा ॥४

द्वेष इर्षा वैर राहिली चुकून 
टाक रे पुसून अंश नको ॥५

मग मी दयाळा होत निरंजन 
जावा मिसळून तुझ्या तेजी ॥६

फिटो सारी देणे दे दिवाळखोरी 
विक्रांता भिकारी सुखे कर ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १३ जुलै, २०२६

ओंकारेश्वर ला

 ॐकारेश्वर (नर्मदाकाठ च्या कविता )
********
श्रद्धेचा व्यापार खुळखुळे भक्ती 
तरी देवा तिथे दिसे तुझी वस्ती 

इथे पूर्ण होती किती मनोरथ
भावभक्ती वाहे किती हृदयात 

जरी जन खुळे कळेना आचार 
डोंगर घाणीचे दोन्ही तीरावर 

परि भाविकांचा ओघ हा थांबेना
नभ व्यापोनिया शिवाच्या गर्जना

कुणी भटकती नौकेत फिरती
पाण्यात मस्तीत कुणी तरंगती

खळखळ करे माय नर्मदा ती
ऊर्जेचे अपार लोट उधळती

नाही दुजाभाव कुण्या जीवाप्रती
अपार अद्भुत सर्वाभूती प्रीती

नमन तुझिया अगम्य लिलेला 
विक्रांत पावन पुण्यनगरीला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ११ जुलै, २०२६

सर


सर
****
कधी ओघळेल प्रभू प्रेम सर 
मनी झरझर तृषार्थ या  ॥

कधी ओलावेल मृतिका चित्तीची 
रुजेल भक्तीची बी बियाणे ॥

कधी विरूढेल ज्ञानाची पालवी 
भक्तीत लाघवी नटलेली ॥

कधी हे फळेल आत्मज्ञान उरी 
कृतार्थ कुसरी सजेल मी ॥

कधी मी पाहीन तुझे प्रेम सुख 
सुखराशी हाक ऐक माझी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

डुकरांच्या गल्लीतून

डुकरांच्या गल्लीतून
****************
डुकरांच्या गल्लीतून असे येणे जाणे घरी 
मग चावणारच डुक्कर कुणा कधीतरी 

काळी पांढरी हिरवी निळी कधी तर
चक्क बहुरंगी असतात बरं हि डुकरं

पण काही लोक असतात फारच हुशार 
ठाऊक असते त्यांना कसे व्हायचे पसार 

काही लोक इथे अनुभवाने शिकतात 
तर काही चतूर वरिष्ठांकडून धडे घेतात

कारण काठी बाळगणे आणि उगारणे
हे असते उगाचंच संकट ओढवून घेणे

डुकरांना आवडते जे बळे तरी देत जावे 
आणि आपण आपले नामानिराळे राहावे 

तुम्ही डुकरांना कधीच सुधारू शकत नाही
राग उद्देग हताशा त्यांना कधीच दिसत नाही

क्वचित एखादे डुक्कर सापडतेही हातात 
मारल्यासारखं त्याला तिथली लोक करतात

पण डुक्कर पुन्हा मुकाट सुटणार असते
आणि डूरक्या मारत मागे धावणार असते

डुकराच्या गल्लीतून जाणे तुम्हाला भाग आहे
अन चावणे हा त्याचा भूत भविष्यकाळ आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 




मंगळवार, ७ जुलै, २०२६

कृपा (नर्मदाकाठ च्या कविता )


कृपा (नर्मदाकाठ च्या कविता )
*******
माई तुझी कृपा अनंत अपार 
चाले पायावर देह माझा ॥
अगा हे चालणे असे तुझे देणे 
अन्य न मागणे मज काही ॥
चालती हे जन किती भराभर 
पाय करकर वाजवत ॥
तयांचे चालणे रोजचे जगणे 
सहज कापणे अंतर ते ॥
देह हा दुर्बळ वेदनांचे घर 
नेलेस तू पार कृपा तुझी ॥
याहून गं मोठा नसे चमत्कार 
वाहिलास भार सवे माझा ॥
अशक्य ते शक्य केलेस तु माय 
जाणतो मी भाग्य माझे इथे ॥
विक्रांत पुण्याचा जाहला प्रवाह 
विसावाला देह तीरी तुझ्या ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ५ जुलै, २०२६

माझी नर्मदा परिक्रमा



माझी  नर्मदा परिक्रमा 
*****************
दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची  परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून घेतली त्यापैकी 135 दिवस चालणे झाले .2013 मध्ये राहिलेल्या अर्धवट परिक्रमेचे शल्य मनातून निघून गेले .मुळात ही परिक्रमा म्हणजे एक तप आहे हे माहीत असल्यामुळे  अडचणी त्रास होणार हे माहीत होते आणि तो झालाही .अर्थात त्याचा स्वीकार असल्यामुळे तो सुसह्यही झाला .
भर उन्हाळ्यातील परिक्रमा हे एक वेगळेच तप होते . गर्दी ओसरली होती , सोबतीला  फार कमी परिक्रमावासी होते त्यामुळे एक निवांतपणा लाभला होता.अर्थात बरेच आश्रमही बंदही झाले होते त्यामुळे काही ठिकाणी अडचणीला सामोरे जावे लागले .पण एका वेगळ्या आणि विलक्षण जगाला सामोरे जाताना मिळालेले अनुभव हे अवर्णनीय आहेत .वेळेचे, वयाचे तसेच शारीरिक बळाचे बंधन असल्याने तसेच पावसाळ्याच्या अगोदर कार्यक्रमा पूर्ण करायचे ठरवल्याने सारीच तीर्थक्षेत्रे, साराच किनारा, सारे घाट पाहता आली नाहीत . कधी वेगळ्या वाटा घेतल्याने काही विलक्षण व्यक्तींना भेटण्याचा योग जुळून आला नाही.पण जे काही दिसले, भेटले, गवसले त्याबाबत मी समाधानी आहे.

विक्रांत प्रभाकर तिकोणे.

धुनी

धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट  जल गेले हरपून  नील रत्न सागरात परी राहिला ओंड...