बुधवार, २२ एप्रिल, २०२६

भय

भय
***
किर्र निर्मनुष्य अश्या 
जयंती माता जंगलात 
मऊ मातीत उमटलेली 
ताजी व्याघ्र पावुले 
अन् एकटेपणी 
चाललेली माझी परिक्रमा .
विशिष्ट जागी झाडीत
येणारा गडद मूत्र  दर्प .

मनात डोकावून पाहिले 
भय नव्हतेही आणि होतेही 
भय नव्हते कारण 
मैयेवर असलेली अपार श्रद्धा 
भय होते कारण 
ती शरीर संवरक्षक नैसर्गिक प्रेरणा 
आणि फिसोलोजीकल यंत्रणा 
ती काम करत होती.

वाचले होते म्हणून 
मोबाईल वर मोठ्या आवाजात
विष्णू सहस्त्र नाम लावले 
काही ही लावले तरी चालले असते.
कारण वाघाला फक्त आवाज कळतो
व तो मनुष्य टाळतो .
सोबत मोठ्याने नर्मदा हर चा घोष सुरू केला.
एका तासाने झाडी थोडी विरळ झाली 

समजा समोर आलेच असते ते राजे
तर काय करू शकलो असतो.
पळू तर शकतच नव्हतो.
कदाचित ओरडलो असतो .
कदाचित खिळून गेलो असतो.
कदाचित मरून गेलो असतो .

पण सगळ्यात सुंदर काय असेल तर
स्वतः त उगवलेले भय
भयात न भिजता पाहणे.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .



शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

बीज

बीज
****
मी घेवून चार बीजे आलो माळरानावर 
दूरवरच्या देशावर खरेच ते रखरखीत होते 
आणि पाहिले डोकावून तिथल्या दऱ्या खोऱ्या 
तर त्या बहरून गेलेल्या हजारो लाखो 
विविध ज्ञात अज्ञात झाड झुडूपांनी 
तरीही माझी  बीज भरली ओंजळ
मी केली रिती त्या माळरानावर डोंगरावर
घळीत कुठल्या आड जागेवर
रुजेल कदाचित एकाध बीज येईन रुजून वृक्ष 
पण त्या सर्वभक्षी शेळ्या ते जगू देतील का?
दोन फूट सावली शेतात पडते म्हणून 
झाडाला कापणारा शेतकरी वाढू देईल त्यांना?
अन् चुलीसाठी फाटा गोळा करणारे
ते गरीब आदिवासी वार करून विद्ध करतात 
 त्या फांद्या ती खोडे त्यांना कोण थांबवणार ?
आणि हा खच इथल्या बिजांचा 
रुजणाऱ्या अन् मरणाऱ्या वृक्षांचा
त्यांना कोण वाचवणार? का हे एक चक्र आहे 
अटळ अंतहिन विनाशाकडे जाणारे
उत्पत्ती स्थिती लय या साखळीतले 
आणि आमचे यत्न प्रयत्न 
आहे एक अरण्य रुदन किंवा स्व संतुष्टीकरण?
अर्थात स्व कर्म कधीच फळ मागत नाही.
***
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ९ एप्रिल, २०२६

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर 
************

रस्त्याच्या घड्याळावर
पायाचे काटे चालतात
अंतर हीच वेळ असते
असा प्रवास चाले सतत 

कधी भेटतो तीर सुंदरसा 
पण बहुदा पथ डांबरट 
कधी पायवाटा वेड्या 
तर कधी शहरे  तिरसट 

अवेळी का रे परिक्रमा 
सूर्य पुसे आग ओकत 
आक्रसल्या सावल्यांचे
वृक्ष आश्चर्याने पाहतात

होणारच कष्ट देहास
मन चिडे कधी त्रासात 
पण जाणतो मीअंतरात 
अरे मी स्वप्न आहे जगत.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

आसावरी ताई श्रद्धांजली

रंग
***
( आसावरीताई काकडे )

रंग रेषा आणि शब्द 
यात जीवा गुंतवूनी 
एक निर्मळ आयुष्य 
जगली ती मनस्विनी 

खिडकीतील इवली
तीच फुले आणि पाने 
वा टीचभर आकाशी
सजून आले  चांदणे

या साऱ्यातून तिजला 
ये जीवनार्थ कळून
तिचे गाणे जीवनाचे 
गेले जीवन भारून 

शब्दा पल्याड तिजला 
दिसे भाव कोंदाटले
अन् संवेदन जीवाचे 
व्यक्त होण्या आतुरले 

ती सजग सहजता 
नात्याविन आत्मीयता 
हृदयाला जुळलेली 
होती ती भाव सरिता

गाता गाता गाणे जरी
गेले मध्येच संपून 
झरता झरता मेघ 
गेले वादळ घेवून 

ते झंकार त्या शब्दाचे 
सदैव मनी राहील
मैत्र जीवी जागलेले 
गंध स्मृतीचा वाहील

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .




भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...