गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

उमेश परमार

उमेश परमार 
**********
परस्पर विरोधी गुणावगुणांनी 
भरलेले व्यक्तिमत्व असलेला उमेश परमार 
जीवना इतकाच मृत्यूलाही खेळ समजणारा 
सहजच पटात गेला मृत्यूच्या 
कबड्डी खेळणाऱ्या खेळाडू सारखा .
खरं तर अनेकदा त्याला 
स्पर्शून हसून हसून परत आलेला हा गडी 
या डावात मात्र, फसला कैचीत त्याच्या 
अन् परत आलाच नाही 

जीवनाच्या लाटावर स्वार झालेल्या
होडीगत तो जगत होता
हिंदकळत गरगर फिरत 
कुठे आपटत कोणावर आपटत 
कुणाला नदी पार नेत तर 
कोणाला मध्येच उतरवत 

त्याच्या आक्रमक आवाजामागे 
बेछूट देहबोलीमागे बेफिकीर वृत्तीमागे 
काय दडले असेल कोणालाच कळले नाही 
त्याचे प्रश्न आर्थिक होते का ?
सामाजिक होते का ?कौटुंबिक होते का ?
या चर्चेला आता काहीच अर्थ नाही 
कारण हे कोणीही सोडवायला गेले नाही 
आणि कुणाला सोडवता येणे नव्हते शक्यही 

मला मात्र आठवते ती रूग्णालयात 
त्याची परत येण्याची आर्जवी  विनंती 
आणि मी त्याला दिलेली संमती 
फक्त स्वत:ला बदल 
एवढी एकच अट ठेवलेली 
पण त्याचे बदलणे हे जणू 
अशक्य कोटीमधले होते 
हेही मला उमगत होते 

पण त्याने चीफ मेडिकल ऑफिसरच्या खुर्चीला 
देव मानले होते हे मला नक्कीच कळत होते 
त्याची ती श्रद्धा आणि आदर 
त्या बाहेरच्या वादळाचे अगदीच विरुद्ध रूप होते 

मला उमेश आठवता आठवता आठवू लागतात 
अनेक चेहरे उमेश सारखे 
माझ्या आजूबाजूला या रुग्णालयात वावरलेले 
आणि असेच अचानक निघून गेलेले 
जीवनाची तमा नसलेले 
भावनांच्या लाटेवर वाहणारे 
व्यसनात सुख शोधणारे 
सदैव अनुत्तरीत प्रश्न असलेले

आणि वाटते हे चेहरे या व्यक्ती 
 मूक हाका तर मारत नव्हते 
आपल्या सर्वांना आजूबाजूच्या सवंगड्यांना 
मानलेल्या मित्रांना सहकामगारांना 
त्याच्या त्या वर्तणुकीतून 
ज्या कधीच पडल्या नाहीत कानावर 
आम्हा कुणाच्याच?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मेघ सावळी

मेघ सावळी ******** मेघ सावळे व्याकुळ ओले जेव्हा  निळ्या नभात जमले हर्षनाद तो गंभीर गहीरा ऐकून वेडे मन बावरले शामल रूप लोभसवाने  ...