****
म्हटला तर अर्थ कशालाच नाही
जन्माला येण्यास जगण्यास मरण्यासही
एक निसर्ग प्रक्रिया आहे या देह मनाची ही
उत्पत्ती स्थिती आणि लय घडवणारी
जसे की लाखो कोट्यावधी जीव
इथे जन्माला येतात आणि मरतात
समुद्रकिनारी पडलेल्या शिंपल्याची गणती
कोण करू शकणार, कोण ठेवू शकणार ?
आणि ठेवूनही काय करणार म्हणा !
नाव वैभव किती क्षणिक हास्यास्पद गोष्टी आहेत
नाही म्हटले तरी जगतांना पोटात पडणारी आग
ती तेवढी खरी असते आणि तेवढीच खरी असते
वस्त्र निवाऱ्याची गरज ही
जगणे आणि जिवंत राहणे वंश सातत्य टिकवणे
या पलीकडे प्रेरणा येतात
तथाकथित बुद्धिमत्तेतून अन्
रक्तात पाझरणाऱ्या संप्रेरका मधून
सेरोटोनिन डोपामिन ऍड्रीनालिन टेस्टोस्टरोन प्रोजेस्टरोन ओक्सिटोसीन वगैरे वगैरे ..
आनंद सुख स्वप्न भीती यांचे हे इवलाले डोस
देतात हातात टाळ, उभारतात प्रार्थना घरे
जमवतात गर्दी शुक्रवारी रविवारी गुरुवारी
कुणालाच कळत नसतं, पछाडल्यागत अन्
संमोहित होत सारे चालत असतात त्याच रस्त्याने
चपला वेगळ्या असतात टोप्या वेगळ्या असतात
पण डोळे तसेच असतात मनही तीच असतात
अन् रक्तात मुरलेली जगण्याची चाकोरीही
ती असते कणाकणात वाहत
जगत जगत मरत मरत पुढे पुढे सरकत
असले हे जीवन तसे पाहिले तर
खरंच अर्थहीन आहे.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा