रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

माऊली

माऊलीस
********
थकलेल्या बाळाला 
घेई कडेवर आई 
चालवत नाही आता 
थोडे तुझे बळ देई ॥१
किती तुडवली वाट 
काटे मोडले पायात 
सारे सोसले पाहिले 
तुझा धरूनिया हात ॥२
नाही आडवाटे गेली 
माझी इवली पाऊले 
तुझे शब्द माझ्या जीवी 
गीत जगण्याचे झाले ॥३
झाली  ओढाताण कुठे 
बोल साहिले विखारी 
नाही जाऊ दिला तोल 
तुज जपले जिव्हारी ॥४
आता बहुत हे झाले 
त्राण माझे ग सरले 
येई धावून तू माये 
करी करुणा कृपाळे ॥५
तुझ्या शब्द पाळण्यात 
मज जोजव निजव
स्वप्न रेखिले ओवीत 
माझ्या डोळ्यांना दाखव ॥६
मग निजेल मी शांत 
तुझ्या प्रेमळ मिठीत 
सारे विसरून दुःख 
जन्म जीवन जगत ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...