रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

सर्प यज्ञ

सर्प यज्ञ 
******
जीवनाचे अत्यंत रसरशीत चैतन्यदायी 
तरीही भयावह रूप असते नागराजाचे 
त्याचा तो एकच फुत्कार
उमटतो शहारे अंगावर 
त्याच्या दंशभयाने या देहात  
वाहतात भयाचे कितीतरी लोट   
तरीही तो जेव्हा फडा उभारतो 
आणि डोलू लागतो कुठे थोडा दूरवर 
मंत्रमुग्ध होते नजर 
विस्तारतात बाहुल्या अन् 
विसरतो आपण आपले भान 

तो कधी काळा कधी पिवळा 
कधी ठिपक्यांचा तर कधी आकड्याचा 
कधी स्वतःच्याच जातीचा भक्षक 
किंग कोब्रा असतो
त्याचे प्रत्येक रूप 
असते भीषण सुंदर 
*
तो दिसत असतो जंगलात
 माळरानात शेतात निर्जन परिसरात 
एकांतप्रित तापट संन्याश्यागत 

त्याचे ते विषदंत असतात 
साधन शिकारीचे संरक्षणाचे 
पण  डसतात  कधीकधी 
मनुष्याला कळत नकळत 
अन् या त्याच्या  प्रतिक्षिप्त कृतीने 
घाबरून चिडून 
माणूस करू लागतो
संहार सा-याच सर्पजातीचा 
तो सर्प यज्ञ 
जो कधीच संपला नाहीत
अन् घडतच आहे विनाश
अश्या हजारो देखण्या जीवांचा 

माणसाला कळत नाही 
की तक्षकाय स्वाहा :
सोबत इंद्राय स्वाहा : नाही तर 
मनुष्याय स्वाहा : हेच घडू शकते .
कारण साखळीतील एक कडी तुटणे 
म्हणजेच साखळी तुटणे असते.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...