सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

सुख


सुख
******
सुख ज्याला सुख मिळते 
तो हसतो नाचतो आणि आनंदाने ओरडतो 
पण ओसरतात ती नशा तो आवेग 
पुन्हा रिक्त हस्त होतो 
आणि पुन्हा धावू लागतो 
नव्या सुखाच्या शोधात 
सुख मिळते डोळ्यांना कानाला 
नाकाला त्वचेला आणि जिभेला 
सुख असते फक्त 
एक न्युरोकेमिकल प्रोसेस
मेंदूला का कुठे चव घेता येते 
वा गंध घेता येतो स्पर्श करता येतो 
मेंदूला पोहोचते ती 
फक्त एक संवेदना एक सिग्नल 
मेंदूला सांगितले गेले असते 
मेंदूत संग्रहित केले गेले असते 
तो तसा सिग्नल मिळताच ते सुख ठरते 
अन् आनंदाचे हार्मोन 
स्त्रवू लागतात रक्तात 
पण काही क्षणातच हरवून जातात 
सुख येते सुख जाते 

खरं तर रस रंग गंध स्पर्श यांची 
गरज असते देहाला आणि मनाला 
अस्तित्वाची निरंतरता टिकवण्यासाठी 
रोग टाळण्यासाठी 
पशुचे भय ठेवण्यासाठी
विषारी फळांचे गंधाचे कीटकांचे 
स्पर्श टाळण्यासाठी 
विषसेवन टाळण्यासाठी 
कारण या संवेदना करत असतात 
संकटांचे निराकरण जीवाचे रक्षण
या पंच ज्ञानेंद्रिया मुळे 
पण ना कळे  कुणास ठावूक
ती कधी अन् कशी झाली सुखाची साधनं 
अन मग सुरू झाली सुखाची स्पर्धा 
हव्यासाची युद्धाची स्वार्थाची विषारी मुळे
रुजली गेली खोलवर मना मनात

जर ही सुख उपभोगाची प्रक्रिया संपली 
कधी तरी कश्यानेतरी नष्ट झाली तर ?
तर हे जग खरोखर सुखी होईल का?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...