शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

बुद्ध होत नाही तोवर

बुद्ध होत नाही तोवर 
***************"
निबीड भयानक अंधकारात 
संकटात दुःखात होता वाताहात 
आशेचा एक किरण शोधत असतो जीव 
दुःख संकट निराशा अपयश 
कुणालाच नको असते 
पण यशाचाच प्रतिध्वनी अपयश असते 
आणि सुखाचेच प्रतिबिंब दुःख असते 
सदा सगळ्यांनाच सदैव दुःख मिळत नसते 
किंवा सुखही मिळत नसते 

पण असतात काही अभागी जीव 
ज्यांच्या जीवनातील दुःखाची वाट 
दैन्याचा उतार सरता सरत नाही  

दुःखाचा जन्म मुळातच दारिद्र्यात आहे 
दारिद्र्याचा जन्म अज्ञानात आहे 
स्वतःचे अज्ञान स्वतःच्या क्षमतेबद्दल अज्ञान 
जगाचे अज्ञान जीवाबद्दलचे अज्ञान 
मनुष्यत्वा बद्दलचे अज्ञान
.
भौतिक सुखाच्या मर्यादा जाणून 
त्या मिळवणे ही एक पायरी आहे 
मनुष्य जीवनाची 
पण बहुतेक जीवनातील निरर्थकता 
एकूणच जीवनाची क्षणिकता तोच तोचपणा 
हे दुःखाचे कारण असू शकते का ?
म्हटले तर असते म्हटले तर नसते 
त्याच्याकडे कोण कसे पाहते 
त्यावर हे अवलंबून असते 

पण खरे दुःख आहे ते गमावण्याचे 
धन ज्ञान परिवार पद प्रतिष्ठा हरवण्याचे 
आयुष्यभर केलेली कष्टाची मिळकत 
उभारलेला डोलारा तो पडण्याची शक्यता 
हे जाणण्यात आहे 
हे सारे नेते मरण एका क्षणात 
अस्तित्वाच्या खुणा ही मिटवत 
हे नसणं मानसिक दुःखाचे कारण आहे 

अर्थात ज्याच्याकडे जास्त 
त्याची आसक्ती जास्त त्याचे दुःखही जास्त 
म्हणूनच संत महात्मे गातात 
निरासक्तीचे त्यागाचे गोडवे 
पण तेही मनाचे ट्रेनिंगच असते 
विवेकाने आणलेले वैराग्य असते 
.
दुःखाच्या निराकरणाचे मार्ग 
प्रत्येक जण शोधत असतो 
आपल्या कृतीप्रमाणे आपल्या समजेनुसार
पण हे अटळ सत्य आहे की 
दुःख कुणालाच सोडत नाही 
तुम्हाला दुःखासवे  जगावेच लागते 
कधी त्याला स्वीकारत 
कधी त्याचाशी तडजोड करत 
कधी हुशारीने शिताफीने 
जमेल तेवढे त्याला दूर ठेवत

पण ते येतच राहते 
अचानक संकटाच्या रूपाने 
आणि आपले व्याज घेतच राहते 
प्रत्येक जीवाकडून 
जोवर तुम्ही बुद्ध होत नाही तोवर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...