बुद्ध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बुद्ध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १४ मे, २०२४

पटाचारा


पटाचारा
*******
एकूनच मानवी समूहाचे
मानव जमातीचे 
चरित्र एकत्र करून 
त्याचा एक गोषवारा केला 
तर त्याला पटाचारा हेच नाव द्यावे लागेल
काही भौतिक स्तरावर 
पटाचाराचे आयुष्य जगतात 
तर काही मानसिक स्तरावर 
पण तिथे पटाचारा अधोरेखित असते 
प्रमाण कमी अधिक असेल 

परंतु प्रत्येक पटाचाराला 
तथागत मिळतोच असे नाही
प्रत्येक पटाचाराला 
हातावर सुकणाऱ्या ओघळाचा 
मतितार्थ समजतोच असे नाही . .

पण जोवर पट्टाचाराचे अस्तित्व आहे 
तोवर जगाला तथागताची गरज आहे
म्हणूनच हातात घेवून आर्य सत्य 
तो पुन्हा पुन्हा येत आहे 
तुमच्या कानाला आणि हृदयाला
सांत्वना देत आहे
कारण करुणा कधीच हरत नसते 
संपत नसते, बेदखल होत नसते 
पटाचाराविषयी


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १० मे, २०२४

एवढेच पुरे



एवढेच पुरे 
********
वेदनांची स्मृती म्हणजे असते भय 
आनंदाचे स्मृती म्हणजे असते आकांक्षा 
आणि ही दिसणारी अस्वस्थता 
भय आणि इच्छेची प्रतिमाच असते 
अरे खरच की 
तर मग काय करायचे कसे बाहेर पडायचे

अरे ही इच्छाच ! त्यातून सुटायची 
पुन्हा त्या चक्राची पुनरावृत्ती करते

असे हे लखलखीत सत्य 
डोळ्यासमोर ठाकते 
तेव्हा खोलवर दडलेले 
अंधाराचे ठसे विरघळू लागतात
 
म्हणून थांब इथेच !
हे जाणणे, हे पाहणे महत्त्वाचे 
पुढे काय घडणार कशाला पाहायचे 

त्यामुळें ते चक्र जन्म घेते
त्या चक्रात फिरणे घडते
म्हणून ते चक्र थांबणे महत्त्वाचे 

त्या स्तब्धतेत निरवतेत 
अस्तित्वात असणे तुर्त एवढेच पुरे 
पुढचे पुढे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

बुद्ध होत नाही तोवर

बुद्ध होत नाही तोवर 
***************"
निबीड भयानक अंधकारात 
संकटात दुःखात होता वाताहात 
आशेचा एक किरण शोधत असतो जीव 
दुःख संकट निराशा अपयश 
कुणालाच नको असते 
पण यशाचाच प्रतिध्वनी अपयश असते 
आणि सुखाचेच प्रतिबिंब दुःख असते 
सदा सगळ्यांनाच सदैव दुःख मिळत नसते 
किंवा सुखही मिळत नसते 

पण असतात काही अभागी जीव 
ज्यांच्या जीवनातील दुःखाची वाट 
दैन्याचा उतार सरता सरत नाही  

दुःखाचा जन्म मुळातच दारिद्र्यात आहे 
दारिद्र्याचा जन्म अज्ञानात आहे 
स्वतःचे अज्ञान स्वतःच्या क्षमतेबद्दल अज्ञान 
जगाचे अज्ञान जीवाबद्दलचे अज्ञान 
मनुष्यत्वा बद्दलचे अज्ञान
.
भौतिक सुखाच्या मर्यादा जाणून 
त्या मिळवणे ही एक पायरी आहे 
मनुष्य जीवनाची 
पण बहुतेक जीवनातील निरर्थकता 
एकूणच जीवनाची क्षणिकता तोच तोचपणा 
हे दुःखाचे कारण असू शकते का ?
म्हटले तर असते म्हटले तर नसते 
त्याच्याकडे कोण कसे पाहते 
त्यावर हे अवलंबून असते 

पण खरे दुःख आहे ते गमावण्याचे 
धन ज्ञान परिवार पद प्रतिष्ठा हरवण्याचे 
आयुष्यभर केलेली कष्टाची मिळकत 
उभारलेला डोलारा तो पडण्याची शक्यता 
हे जाणण्यात आहे 
हे सारे नेते मरण एका क्षणात 
अस्तित्वाच्या खुणा ही मिटवत 
हे नसणं मानसिक दुःखाचे कारण आहे 

अर्थात ज्याच्याकडे जास्त 
त्याची आसक्ती जास्त त्याचे दुःखही जास्त 
म्हणूनच संत महात्मे गातात 
निरासक्तीचे त्यागाचे गोडवे 
पण तेही मनाचे ट्रेनिंगच असते 
विवेकाने आणलेले वैराग्य असते 
.
दुःखाच्या निराकरणाचे मार्ग 
प्रत्येक जण शोधत असतो 
आपल्या कृतीप्रमाणे आपल्या समजेनुसार
पण हे अटळ सत्य आहे की 
दुःख कुणालाच सोडत नाही 
तुम्हाला दुःखासवे  जगावेच लागते 
कधी त्याला स्वीकारत 
कधी त्याचाशी तडजोड करत 
कधी हुशारीने शिताफीने 
जमेल तेवढे त्याला दूर ठेवत

पण ते येतच राहते 
अचानक संकटाच्या रूपाने 
आणि आपले व्याज घेतच राहते 
प्रत्येक जीवाकडून 
जोवर तुम्ही बुद्ध होत नाही तोवर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

तुकडा आयुष्याचा

तुकडा आयुष्याचा  ************* हा तुकडा आयुष्याचा  टेकला आभाळाला  अन्  धुरळा मातीचा प्रकाशाचा झोत झाला  जरी भाग्य मातीचे  सदा अस...