रविवार, १८ मे, २०२५

पळस

 पळस
****
तो आकाशात
झेपावणारा पळस 
सुंदर आणि हिरवागार 
जेव्हा कोसळला भूमीवर 
झेलत घाव देहावर 
मग त्या विशाल पानांनाही 
धरला नाही तग
काही काळ लहरून 
साहून उन्हाची धग 
गेली तीही होत मलूल 

वर्षभर वाढणारे झाड 
क्षणात गेले होते पडून 
पदपथावरील दिव्याचा प्रकाश 
अडतोय म्हणून 
तेव्हा हुंदक्यांनी 
गेला होता सारा परिसर भरून 
आणि माझ्या डोळ्यांनी 
त्याला साथ दिली रात्रभर जागून 

उद्या त्या झाडावर बसणारा 
नाचरा बुलबुल काय म्हणेन
सात भाईंचे कलकलाटी 
खोटं भांडण कुठे रंगेन 
मलाच कळत नव्हते
त्यांना काय सांगायचं ते 

तसे झाड पाडायला 
कुठलेही कारण पुरे असते माणसाला 
शहरातील मेट्रो असो 
देवाची लाट असो 
वा दिवा प्रकाशाचा अडथळा असो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घडव जगणे

घडव जगणे  ********* घडव जगणे माझे दत्तराया  रोग भोग माया हरवून ॥ तुझिया पायीचा करी रे सेवक  भक्तीचे कौतु...