दुःख
*****
दुःख साचले मनात नको अडवून धरू
पाणी वाहू दे ग डोळा
नको कढ उरी भरू ॥१
दुःख चुकले कोणाला
राजा अथवा रंकाला
पहा उलटून पाने
आले प्रत्येक वाट्याला ॥२
दुःख भेटले सीतेला
जन्म वनवास झाला
दुःख वाटा द्रौपदीला
जन्म वणवाच झाला ॥३
दुःखे शिणली विझली
शिळा अहिल्या ती झाली
राजा सवे तारामती
किती फरफट झाली ॥४
हि तो दुःखाची शिखरे
जणू दिसती सागरी
लाखो पहाड पर्वत
खोल असती दडली ॥५
खेळ दुःखाचा हा असा
युगे युगे रे चालला
पूस डोळ्यातले पाणी
हास हरवून त्याला ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा