शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

निरोप

निरोप
*****

निरोप या घटनेला कितीतरी पैलू आणि छटा आहेत.
जसा की प्रेयसी व प्रियकराने  घेतलेला निरोप , 
हा निरोप कधीकधी त्या दिवसा पुरताच असतो . पण त्यात दुसऱ्या दिवशी भेटायची ओढ असते, आश्वासन असते. 
तर कधी प्रेमाच्या शेवटच्या टप्प्यात मिलन अशक्य ठरल्याने ,एक शेवटचा निरोप ही घ्यावा लागतो. त्यात असहायता असते.द्विधा मनस्थिती असते, कर्तव्याचे भान असते.

आई  बाप जेव्हा मुलगी सासरी जातांना तिला निरोप देतात त्या निरोपात व्यथा असते . तळहाताच्या फोडा सारखी जपलेली मुलगी दुसऱ्याच्या घरात पाठवतांना होणारी कालवा कालव आणि तिच्या भविष्यातील सुखा बद्दल आशा अन् काहीशी चिंता यांचे ते संमिश्र भावना कल्लोळ असते. 
 
युद्धावर लढायला जाणारा सैनिक ज्या वेळेला आपल्या पत्नीचा, आई-वडिलांचा आणि मुलांचा निरोप घेतो, त्यावेळेला त्या निरोपात एक भय असते की कदाचित आपण यांना पुन्हा पाहू शकणार नाही .त्यामुळे त्या निरोपात एक विलक्षण आर्तता असते. 

नवविवाहित पत्नी माहेरी जाताना  तिला
दिला जातो निरोप त्यात एक वेगळाच रंग असतो.

गावावरून येताना वृद्ध आजी-आजोबांचा निरोप घेतानाही तीच व्याकुळता मनात दाटून येते .

निरोप कधी तात्पुरता असतो तर कधी कायमचा शेवटचा असतो.

प्राणप्रिय जीवलगांच्या महायात्रेत सामील होतांना आणि त्या यात्रेची सांगता करताना घडणारा निरोप काळजात व्रण उमटवणारा असतो .

तर कधी आषाढी संपल्यावर पंढरपूरचा निरोप घेताना वा ज्ञानदेवांच्या समाधी मंदिरातून बाहेर पडताना किंवा गिरनारच्या शेवटच्या पायरीवर माथा टेकवताना अथवा पाच दहा दिवस घरात राहिलेल्या गणपती  बाप्पाला विसर्जनासाठी नेतांना उरात होणारा  तो कालवा त्या निरोपाला काय नाव द्यावे कळत नाही.

काही निरोप शब्दात उतरतात काही डोळ्यात तर काही मनात .तर कधी निरोप घ्यायचा राहूनही जातो अन् ती खंत उरी डाचत राहते.

निसर्गात तर हि निरोप व भेटण्याची शृंखला अविरत त्याच उत्कटतेने घडतांना दिसते संध्याकाळच्या सूर्याचा निरोप , पहाटे पहाटे चंद्राचा निरोप,  वर्षा ऋतू सरता सरता मेघांनी घेतलेला निरोप, 

ज्या निरोपात आपले अस्तित्व थरथरते ,आत काहीतरी हलते तो निरोप खऱ्या अर्थाने निरोप असतो अन्यथा ते गुडबाय ,हात रिवाजी हलणे असते.

विक्रांत तिकोणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...