शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

यत्न

यत्न
*****
येतात तुझी पत्रे किती 
पण निरोप कळत नाही 
दिसतात शब्द कितीतरी 
पण अर्थ कळत नाही ॥

रे  तुझा खेळ अवघड
तू मला सापडत नाही 
ऐकुन तुझ्या हाका धावतो 
तू कधीच दिसत नाही ॥

मी विचारले दिशांना तर
त्यांना अस्तित्वच नाही 
मी विचारले काळाला तर 
तो सदैव हाच क्षण पाही ॥

मी गेलो विचारत त्यांना 
जे बहुदा भेटले तुला
पण ते गढून शून्यात
होते विसरले या जगाला ॥

धरल्या सोडल्याविन मग
असण्यातच राहिलो बसून
कळले की उजळतात दिशा 
कुठल्याही यत्ना वाचून ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...