लज्जत
*******
दुःखाबद्दल
माझ्याशी हुज्जत
घालणाऱ्या कविता
जेव्हा उतरतात
संध्याकाळी खाली
माझ्या घराच्या छतातून
दाटणाऱ्या अंधाराचा हात धरून
वा येतात स्मृतीच्या अडगळीतून
मनाचे कवाड उघडून
रेंगाळत दबकत धूर्तपणे
किंवा आक्रमक आगावू पणाने
अन् पसरु पाहतात सभोवताली
माझे अस्तिव गिळून
मी त्यांना पकडतो अन्
टाकतो बुडवून
चहाच्या कपात
मग पितो चवीचवीने
हलकेच फुंकर मारत
खरच सांगतो
तो चहा खूपच चविष्ट असतो
मला ठाऊक आहे
कविताची हुज्जत कधीच
थांबणार नाही
आणि चहाची तलपही
सरणार नाही
अर्थातच तोवर
सुख दुःखाला कवटाळून
असोशीने जगणाऱ्या झिंगणाऱ्या
जीवनाची लज्जतही
मिटणार नाही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा