मरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २७ मे, २०२५

लास्ट स्टेज कॅन्सर


लास्ट स्टेज कॅन्सर 
*************************
आस जगण्याची सुटता सुटेना
झिजतोय देह मन स्वीकारेना 

अडकला जीव पुन्हा प्रतिबिंबी
तडकली काच  आकळेना बिंबी

सोड बाई आता फाटलेली खोळ 
सोसते का दुःख पाहवेना हाल 

असतो का दुष्ट देव मरणाचा 
वेदनेचा डोह किंवा प्राक्तनाचा 

फाटलेला खिसा बेजार लाचार 
निरोप देण्यास उत्सुक अपार 

तया प्रेम नाही असे मुळी नाही
मागे उरणाऱ्या हिशोबाची वही 

मृत्यूहून अशी प्रतीक्षा मृत्यूची
पाहणे ही जणू सजा स्वकीयांची
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

सायरस मिस्त्री च्या निमित्ताने

सायरस मिस्त्री च्या निमित्ताने 
***********************
सुखात सजले क्षणात सरले 
जीवन भिजले वैभवात ॥१
असून भोवती सुख ते अपार 
गेला भोगणार एकाक्षणी ॥२
स्वप्न तुटले डाव मोडले 
भोग राहिले उरामध्ये॥३
हे तो घडते घडतच असते 
परंतु पाहते कोण इथे ॥४
अन प्रश्ना ज्या उत्तर नसते 
डोके फोडते कोण तिथे ॥५
स्वप्नचि असते ज्याचे जगणे 
त्याचे मरणे क्लेषाधिक ॥६
ठाऊक तुजला ठाऊक मजला 
जवळ ठाकला मुक्काम तो ॥७
घडते स्मरण त्याचे दाटून 
येताच घडून असे काही॥८
या मरणाचा खेळ दावला  
मज निशंक केला दत्तात्रेये ॥९
जग रे विक्रांत वा मर आता 
नुरला गुंता कुठेच काही ॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘..

शनिवार, २५ जून, २०२२

ती

ती ( After news of my class mate Dr.Alpana ...RIP)
**

ती धवल शुभ्र कांतीची 
ती मुग्ध नितळ हास्याची 
तेजस शितल डोळ्यांची 
दुसऱ्याच जगातली ॥१

ती सुखात रमलेली 
ती जीवन नटलेली 
फळाफुलांनी बहरलेली 
वासंतिक तरुवेलच ॥२

ती यशाची सुरेल गाणे 
ती प्रीतीचे मुग्ध तराणे 
सुखाचे सारेच बहाणे
होते उभे तिच्याचसाठी ॥३

ती जणू की स्वर्गलोकात 
स्वप्न सजल्या गौर देशात 
चिअर्स घेऊन कणाकणात 
जगत होती आनंदात ॥४

पण जाताच अकस्मात 
अर्धा डाव मोडत सोडत 
पुन्हा गहन गेला होत
प्रश्नचिन्ह जीवनाचा  ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

वेदना मरण


वेदना मरण
*********

नको देऊ दत्ता 
ऐसे हे शासन 
वेदना मरण 
कधी कुणा ॥१

दिलीस तू व्याधी 
अस्तित्व पुसण्या 
बुद्धीने कवण्या 
न च कळे ॥२

आलो आम्ही इथे 
ठाऊक जाणार 
काय करणार 
उपाय ना॥३

परी जावू देत 
देह हळुवार 
जैसे भूमीवर 
पान पडे ॥४

नको धडपड 
नको तडफड 
नुठो काही नाद 
सुटतांना ॥५

विक्रांत मागतो 
जगता मरण 
वेदने वाचून  
कृपाघना ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, ३० एप्रिल, २०२२

एक मरण

मरण
*****

दाविलेस दत्ता एक ते मरण 
जेणे झाले मन कासावीस ॥१

खुराड्यात जन्म मृत्यू खुराड्यात
होत्याचा क्षणात नाही होय ॥२

सुखासाठी कण  गोळा जे करून 
ठेविले रचून  एक एक ॥३

जाहले ते व्यर्थ जाई ना सोबत
देहाचे ही काष्ट त्यात एक ॥४

यश कीर्ती धन अन् जीवलग 
सारा लागभाग क्षणी मिटे ॥५

घेतले जे ज्ञान वाचविण्या प्राण 
शून्यचि पै जाण झाले इथे ॥६

करावा जीवने कुणाचा भरोसा 
कसला भरोसा येथे आता ॥७

जाणे असे जरी मृत्यूच्याच दारी 
दत्ता हात धरी  तया वेळी  ॥८

दिवा पेटलेला असावा देव्हारी 
अन् फुलावरी ओला गंध ॥९

तरी ते गमन होय असे सार्थ
जाणतो विक्रांत पाहूनिया .॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

मरण

झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी

मरण
*****
असे हवे रे
सुंदर मरण  
ज्यात ओघळून 
जाईल जीवन

असे असावे 
सहज मरण  
अट्टाहासावीन 
जगणे अजून

हळूच जावे 
कोणी फुंकून
ज्योत इवली 
सायासाविन 

होती ज्योत हे
कळल्या वाचून
घन तिमिरात  
जावी बुडून

काही तडफड 
झाल्या वाचून
वलय जावे
विलय होवून 

जसा उमटून
जातो हरवून
शब्द नभात
उरल्यावाचून

उरते स्मृति का
कुण्या फुलाची
खुण राहती
वा मृग सरीची 

हे आनंदाने
गाणे सजले
आनंदात च
व्हावे सरले 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********


 

बुधवार, २० मे, २०२०

प्रवास

प्रवास
******

प्रत्येकाचं मरणाचं गाव 
ठरलेलं असतं 
कुणी कधी का मरावं 
याला कारण नसतं.
अन हे जे कारण दिसतं
ते फक्त कारण असतं

येताच ते स्टेशन, 
त्या गावाला 
जीवनाच्या गाडीतून 
गपगुमान उतरून जावं लागतं 
गाडी चुकत नाही 
स्टेशनही हुकत नाही 
मरतो का आम्ही 
मारतो कोण आम्हाला 
खरंच कळत नसतं 

 या गाडीचे तिकीट 
कोण कधी काढतो 
अन अंतराचे गणित 
कोण कसे मांडतो 
सारेच प्रश्न अनुत्तरीत 
सामान्यजनांना 

देव पाहिलेला ही 
उतरून जातो 
देव न पाहिलेला ही 
उतरून जातो 
फरक एवढाच 
त्यांना माहीत असतं 
कधी कुठे उतरायचं 
अन स्वातंत्र्य असतं 
पुन्हा चढण्याचं 

बाकी आम्ही . . 
आम्हाला कुठल्या तरी 
प्रवासात कळतं 
आम्ही प्रवास आहोत ते 
प्रवासाचा आनंद लुटत 
रममान होतो प्रवासात 
प्रवासातील सोबत्यात 
अन उतरायचं नाव काढलं की 
चिडतो ओरडतो वैतागतो 
अन कुणीतरीअपरिहार्यपणे 
उतरून देऊ लागताच 
आकांत करतो 
आकांत करत उतरतो

गाडी निघून जाते 
नवीन गाडीत नवीन होऊन 
मागचे सारे सारे विसरून 
पुन्हा सुरू होतो 
एक प्रवास 
कुठे पासून कुठपर्यंतचा 
माहीत नसलेला 
कदाचित
पुन्हा उगमाकडे नेणारा 
वा पुन्हा रुळांच्या चक्रव्युहात
गुरफटणारा .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

न्याय

न्याय ****** तीच न्याय संस्था फाशी सुनावते  तीच न्याय संस्था निर्दोषही ठरवते  व्यक्ती तीच असते  आरोपही तेच असतात  सुनावनी तशीच ह...