बुधवार, २० मे, २०२०

प्रवास

प्रवास
******

प्रत्येकाचं मरणाचं गाव 
ठरलेलं असतं 
कुणी कधी का मरावं 
याला कारण नसतं.
अन हे जे कारण दिसतं
ते फक्त कारण असतं

येताच ते स्टेशन, 
त्या गावाला 
जीवनाच्या गाडीतून 
गपगुमान उतरून जावं लागतं 
गाडी चुकत नाही 
स्टेशनही हुकत नाही 
मरतो का आम्ही 
मारतो कोण आम्हाला 
खरंच कळत नसतं 

 या गाडीचे तिकीट 
कोण कधी काढतो 
अन अंतराचे गणित 
कोण कसे मांडतो 
सारेच प्रश्न अनुत्तरीत 
सामान्यजनांना 

देव पाहिलेला ही 
उतरून जातो 
देव न पाहिलेला ही 
उतरून जातो 
फरक एवढाच 
त्यांना माहीत असतं 
कधी कुठे उतरायचं 
अन स्वातंत्र्य असतं 
पुन्हा चढण्याचं 

बाकी आम्ही . . 
आम्हाला कुठल्या तरी 
प्रवासात कळतं 
आम्ही प्रवास आहोत ते 
प्रवासाचा आनंद लुटत 
रममान होतो प्रवासात 
प्रवासातील सोबत्यात 
अन उतरायचं नाव काढलं की 
चिडतो ओरडतो वैतागतो 
अन कुणीतरीअपरिहार्यपणे 
उतरून देऊ लागताच 
आकांत करतो 
आकांत करत उतरतो

गाडी निघून जाते 
नवीन गाडीत नवीन होऊन 
मागचे सारे सारे विसरून 
पुन्हा सुरू होतो 
एक प्रवास 
कुठे पासून कुठपर्यंतचा 
माहीत नसलेला 
कदाचित
पुन्हा उगमाकडे नेणारा 
वा पुन्हा रुळांच्या चक्रव्युहात
गुरफटणारा .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घेई सोबत

घेई सोबती ******** कंटाळून जगताला  म्हणे विक्रांत दत्ताला  का हो टाकले मजला  ऐश्या या भोगवट्याला  तुम्ही घेतले ते छान  एक कौपीन ...