नाथ जोगी
********
डंका वाजतो वाजतो
नाथ जोगी मिरवतो
ओस पडल्या मनात
ध्वनी अलख गाजतो ॥
धुनी जळते जळते
पाप दोष हरविते
नाथ ओंकार साकार
विश्वभान हरविते ॥
शब्द शाबरी विद्येचे
वेद मूर्तिमंत झाले
जड जीवास तारण्या
जनी कृपे मिसळले ॥
नाथ विरक्त उदास
आत्मरति सदा मग्न
भक्ती शोधते जयाला
ऐसे पृथ्वीमोल रत्न ॥
सदा डोळ्यात विक्रांत
स्वप्न नाथांचे पाहतो
दत्त स्नेहाचे चांदणे
मनो मनी पांघरतो ॥
प्रेम करता पिलांस
माय मनी सुखावते
प्रेम जाणूनिया खरे
माय कृपावंत होते
नाथ दत्त अैसे मज
दोन्ही भेटले कृपाळू
झाले जिवलग किती
प्राण तयास ओवाळू
दृढ ठेवा मज इथे
आणि काही न मागणे
बाकी घडो काही मग
देहा येणे आणि जाणे
*©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा