सोमवार, २५ मे, २०२०

कोरोना वार्डात

कोरोना वार्डात
**********

कोरोना वार्डात 
चिंतातुर रुग्ण 
दाटलेले प्रश्न 
मुखावरी ॥
कुणा थोडा ताप 
कुणा लागे धाप 
कुणा नसे झोप 
रात्रंदिन ॥
बाहेरून बंद 
कक्षाचे ते द्वार 
चाले येरझार
आतमध्ये ॥
स्वतःहून साऱ्या 
घराचीच चिंता 
जिवलग चित्ता
सदोदित ॥
परी एकमेका 
देऊनी आधार 
चाले व्यवहार
 सबुरीचा ॥
कोरोनाच्या कथा 
डोक्यात नाचती 
सांभाळावे किती 
मनामध्ये ॥
बेचव ते अन्न 
येई भरपूर 
परी जाई चार
घास आत ॥
त्यात काही होते 
काही चिन्हां विना 
नशिबाने त्यांना 
साथ दिली ॥
इतरांस तेही 
होते सांभाळत 
आणि धीर देत
 वेळोवेळी ॥
परी काही केल्या 
नव्हते सरत 
दिन उलटत 
भरभर ॥
मग दिनमान 
तेही उलटले 
आले ते भोगले 
भोग सारे ॥
थंडावले युद्ध 
रोग ओसरला 
परी तो उरला 
बंदिवास ॥
भयाची सावली 
मिटता उरली 
मनी भरलेली
कृतज्ञता ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...