शनिवार, ३० एप्रिल, २०२२

एक मरण

मरण
*****

दाविलेस दत्ता एक ते मरण 
जेणे झाले मन कासावीस ॥१

खुराड्यात जन्म मृत्यू खुराड्यात
होत्याचा क्षणात नाही होय ॥२

सुखासाठी कण  गोळा जे करून 
ठेविले रचून  एक एक ॥३

जाहले ते व्यर्थ जाई ना सोबत
देहाचे ही काष्ट त्यात एक ॥४

यश कीर्ती धन अन् जीवलग 
सारा लागभाग क्षणी मिटे ॥५

घेतले जे ज्ञान वाचविण्या प्राण 
शून्यचि पै जाण झाले इथे ॥६

करावा जीवने कुणाचा भरोसा 
कसला भरोसा येथे आता ॥७

जाणे असे जरी मृत्यूच्याच दारी 
दत्ता हात धरी  तया वेळी  ॥८

दिवा पेटलेला असावा देव्हारी 
अन् फुलावरी ओला गंध ॥९

तरी ते गमन होय असे सार्थ
जाणतो विक्रांत पाहूनिया .॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...