बुधवार, २० एप्रिल, २०२२

दुपार

दुपार 
*****

वारा सळसळ 
करतो हलके 
क्षणात दृश्य 
करतो बोलके 

फांदी वरचे 
फुल सावरते 
पराग आपले 
उधळून देते 

पाना मधला 
पक्षी पिवळा 
शीळ घालत 
होतो भरारा 

माऊ बिचकत 
लक्ष हरवते 
खार इवली
निसटुन जाते 

चार पिवळी 
पाने दमली 
बस्स म्हणुनी 
होतात सुटली 

पाना मागील 
फळ पिकले 
क्षणात होते 
कुणी हेरले 

जल पृष्ठावर 
विहिरीमध्ये 
मान वळवून 
झाड पाहते 

क्षणात सगळे 
तसेच होते 
दुपार हलके 
कुस बदलते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...