मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

संसार

संसार 
**********

एकटे असा  वा दुकटे असा 
संसार कधीच संपत नसतो 
कवटाळून कधी दुःखाला 
जीव रडत बसत नसतो 

ती गेली की तो कोलमडतो 
चिमण्या हातास धरून 
पुन्हा उभा राहतो 
तो गेला की आभाळ फाटते 
पण सावरते सांभाळते 
ती विशाल वृक्ष बनते 
कारण आनंद 
हे जगण्याचे कारण असते 
तो नाकारणे यासारखे पाप नसते 

तो गेल्यावर तिने नटू नये 
छान सुंदर जगू नये 
हे कधीच मान्य करू नये 
पुरुषांचे दांभिक जग 
फारस मनावर घेऊ नये 

त्याचे तसे बरे असते 
त्याला दुसरी सहज मिळते 
तयारी असेल तर तिलाही 
दुकटे होणे शक्य होते 

अन ते तसे व्हावे ही 
पण गरज म्हणून नाही 
तडजोड म्हणूनही नाही 
तर आनंदाने युगल गीत 
गाता यावे म्हणून 
सुखाला आनंदाचा 
स्पर्श व्हावा म्हणून 

खरेतर एकटेपणात ही 
चांगले छान सुंदर जगता येते 
ध्येयाचे स्वप्नांचे हरवलेले पान 
पुन्हा उलगडता येते 

पण हा संसार 
करावाच लागतो 
जगात राहून वा वनात जाऊन 
एकटेपणाने व दुकटे होऊन 
हे मात्र विसरायचे नसते
अन आपण आपल्या 
आनंदाचे समायोजन 
जरूर करायचे असते.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...