कहाणी
*******
एक आरंभ एक अंत
असतोच प्रत्येक कहाणीला
बहुधा सुरू होते
कुठलीही कहाणी
उत्सुकतेने भरलेली
स्वप्न सजलेली
अपार अपेक्षांनी नटलेली
ती पाने ते दिनरात
किती भरभर उडून जातात
सुखाची सकाळ
सुखाची संध्याकाळ
सुखात नाहते रात
पण कहाणीच असते ती
तशीच कशी राहणार
काही पात्र बदलतात
काही सोडून जातात
काही नवीन येतात
काही आपली मूळ
भूमिका टाकून देतात
भलत्याच भूमिकेत घुसतात
आणि मग सुरू होते
एक टळटळीत दुपार
तप्त न सरणारी
असह्य लाहीलाही करणारी
ती वेळ
अन उगवते रात्रही
तशीच रुक्ष एकाकी
पापणीस पापणी
लागू न देणारी
त्या नाटककाराला लेखकाला
ही कुठली हौस असते कळत नाही
प्रेमाच्या मैत्रीच्या वाटिकेत
द्वेष असूया संशय हेवेदावे अन
शत्रुत्वाची बीज टाकून देतो तो
मग दोन रूळागत समांतर
जीवन चालू राहते
तर कधी खाली कोसळून पडते
कहानीला रंजक करणे
आणि मग मजा घेणे
हे त्या लेखकाला
फार फार आवडते
हे नक्कीच
सुखा कडून दुःखाकडे
अन दु:खाकडून पुन्हा सुखाकडे
जाणारी कहाणी
क्वचित असतेही कुणाची
कोण्या आटपाट नगराच्या
धार्मिक राजाची
किंवा व्रत आचरण करणार्या
भोळ्या राणीची
म्हणजे ती तशी
बाहेरून दिसते तरी खरी
बाकीच्या कहाण्या
कहाणीपण सार्थ करणाऱ्या
झुरणाऱ्या तुटणाऱ्या
तुटलेल्या कड्याशी येऊन
थांबलेल्या खोळंबलेल्या
कधी कधी बिघडलेल्या ओळीवर
व्हाईटनर चे औषध लावत
स्वतःला खेचत
जात असते की कहानी
पुढे पुढे निरूपायाने
तर कधी
फसलेल्या क्लायमॅक्सला
भुतकाळात नेत
संपलेल्या दिवसात
राहते उगाच जगत
ती कहाणी
तर सांगायचे होते
प्रत्येक घराची एक कहाणी असते
प्रत्येक मनाची एक कहाणी असते
बहुदा पर्सनल डायरीगत
कुलुप बंद असते
पण कधीतरी कुणाची पाने सुटतात
दाही दिशात पसरतात
लोक ती धावून धावून वेचतात
अन मजेने वाचतात
अन वाचतांना
मनोमन जाणत असतात
ही त्याचीच कहाणी आहे .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा