बुधवार, ५ एप्रिल, २०१७

विनवणी श्रीरामा ।।



विनवणी श्रीरामा ।।

जरी मी नच राम लायक ।
परी तो प्रभू जगतपालक ।
कलीमलहारी त्रिभुवनपालक ।
ठेवो माझी अल्पशी ओळख।।

मी तो मोही तुडुंब भरला 
विषयानुरागी थिल्लर थोरला 
सदा कर्दम वाढवीत आपुला 
चित्त सरोजी भ्रमर  भरला।।

मस्त खेळती कुंजर माजले 
काम भाव जे विभ्रम उठले 
गाळी अडकले मकरी गिळले
भक्तीभाव जे मनात सजले ।।

जन्म भोगतो नशेत दुःखद
तुझी करुणा माझे औषध 
हे रघुनाथ जय नरेश अवध 
येऊन माझे हे मीपण वध ।।

सुने जैसे हाडी अडकले 
जंबुक वा चामडीत गुंतले
क्षणभोगी मन मोही जडले
नाम घेतले जणू वाया गेले ।।

भ्रमित विक्रांत खेळे चकवा 
चोरे लुटले तव निघता गावा 
गिध वानर रिस जपले तुवा 
लोटू नको या मूढ मानवा ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...