बुधवार, १९ एप्रिल, २०१७

नवीन वेदना


काहीतरी कारण ती
जगायला शोधतांना
विस्कटल्या दिवसांना 
नीट रचू पाहतांना



भेटलीच तिला पुन्हा
एक नवीन वेदना
विझलेली आग पुन्हा
दिसे धगधगतांना

सावलीची मिठी जैसी
तना मनास स्पर्शेना
स्वीकारून सांत्वनाही
कधी सोबत येईना

कड्याकडे जाणारी ती
जणू काही धुंद वाट
जीव धावतो उनाड
वारा बांधून पायात

सांभाळ ग सखीबाई
दुनिया ही खरी नाही
वेड्या वेंधळ्या मनाची
धाव ही ग बरी नाही

इथे गोष्टी शापांच्याच
मनामनात नांदती
कथा चुकल्या पायांची
धडा होवुनी सांगती

सारे कर्मठ पिंजरे
लाल चाबूक गोजिरे
दाही दिशांना आरसे
मार्ग अडलेले सारे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...