रविवार, ४ डिसेंबर, २०२२

(गणपती) साथ


साथ
************
देव गणपती माझा 
मज सांभाळतो किती 
माझ्या जीवन प्रवासी 
चाले धरूनिया हाती ॥

दार उघडण्या जाता 
देव डावीकडे असे 
रूप धुम्राचे सावळे 
मला आभाळची भासे ॥

दार उघडता देव 
उभा सामोरी असतो 
प्रभा तेजाची रूपाची 
मज पावन करतो ॥

डोई फेटा भरजरी 
दृष्टी प्रेमळ रोखली 
चल जा मी साथ आहे 
शब्द गुंजती अंतरी ॥

घर सोडता सोडता 
येतो गेटच्या जवळ 
सिद्धी विनायक होतं 
देई निरोप प्रेमळ ॥

तोच आरूढ वाहनी 
रथ माझा रे सावरी 
पथ निष्कंटक करी 
जणू आणे कामावरी ॥

आत जाता ऑफिसात 
असतो टेबलावरी 
काम प्रामाणिक माझे 
देई साक्षीची स्वाक्षरी ॥

कर्म हाती बघ तुझ्या 
मज सांगे गणपती 
मनी पेरतो सुबुद्धी 
वाट दाखवत खोटी ॥

त्याचा म्हणवितो गण 
कर्म पेलतो कळती 
फळ देता तया पायी 
सुख मिळते विक्रांती ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...