सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

महामानवास


महामानवास,
**********
तसे तुमचे वैयक्तिक वैर 
तर कोणाशीही नव्हते 
तरीही तुमचे युद्ध खरे होते 
ते समतेसाठी न्यायासाठी 
माणुसकीसाठी मांडलेले रण होते 
त्यात तुम्ही जिंकलाही 
पण युद्ध संपले नाही 
युद्ध संपत नसतात 
युद्ध फक्त शमतात 
तुम्ही गेलात ते युद्ध लढून 
कर्मयोग्या समान कर्तव्य करून 
पण तुमची ती पडलेली शस्त्रे 
ती आता कुणालाही उचलत नाहीत 
तेवढी ताकदच नाही कुणात 
मग सगळे त्या शस्त्राला फुले वाहून 
त्यावर रंग उधळून करतात त्याची पूजा 
त्याची धार दाहकता मारकता हरवून
त्याची आर्तता कळकळ विसरून 
त्या शस्त्रा सवे फोटो काढून 
आपलाच कंपू तयार करून 
राहतात मिरवत 
हे शस्त्र माझे आहे म्हणवून 
त्या शस्त्राने त्याचे 
तोडायचे  काम चोख केले 
पण त्याचे ते जोडायचे काम 
ते बाकी आहे अजून
एक संघ, एक मताचा, 
एक विचाराचा, बंधुत्वाचा,
प्रेमाचा निखळ समाज करणे 
बाकी आहे अजून.
त्या साठी कदाचित 
तुम्हाला परत यावे लागेल 
या खरच या, 
आम्ही तुमची वाट पाहतोय
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...