बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

दगड



दगड
:*****
राजवाड्याच्या बागेमध्ये पडलेला 
एक क्षुल्लक दगड 
मिरवत होता फुशारत होता 
मी राजाच्या बागेतील दगड आहे म्हणून 
राजाला तर त्याचा पत्ताही नव्हता 
आणि पत्ता होणारही नव्हता 

तो दगड कदाचित 
राजवाडा होण्याच्या अगोदरही तेथे होता 
किंवा कुठल्यातरी सामानातून 
तिथे येऊन पडला होता 
किंवा कोणीतरी कुठून तरी  फेकला होता 
पण तेही त्याला आठवत नव्हते 

पण ज्या क्षणी त्याला जाणीव झाली 
आपल्या असलेपणाची आपल्या क्षुल्लकपणाची
आणि निरर्थकथेची तो झाला राजाचा दगड 
आणि त्या स्वनिर्मित सांत्वनेत 
त्याने शोधला अर्थ स्वतःचा स्वतःपुरता 
अन तो म्हणून घेऊ लागला स्वतःला 
राजाचा दगड राजाचा पाईक राजाचा समर्थक 
आणि राजाचा भक्त ही
फक्त आजूबाजूची शहाणे त्याला 
विक्रांत म्हणत होते एवढेच

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

होशी दत्ता

होशील दत्ता ********* कुणासाठी होशी दत्ता तू रे देव  स्वीकारशी भाव हृदयीचा ॥१ कुणासाठी होशी दत्ता तू रे बाळ  कृपाळ प्रेमळ लीलाधर...