शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

काळ

काळ
****
काळ सरता सरतो सूर्य विझता विझतो 
चंद्र झिजता झिजतो हळू विक्रांत मरतो॥१

जन्मा आधी रे तो होता राही देह तो सरता
सांगे भगवद् गीता मग कशाला ती चिंता ॥२

जन्मा आधी रे परंतु तो हा  नव्हता विक्रांत
मन पुसता विझता कैसा येईल विक्रांत॥३

काही नाव या देहाला अन गाठी संस्काराला 
चिंता आकाराची का रे अशी पडे पुतळ्याला ॥४

खेळ मातीचा मातीला व्यथा का रे चैतन्याला 
सुख दुःखाच्या मुशीत नक्षी क्षणाची काळाला ॥५

काळ असतो अकाल वेळ मानवे निर्मिली 
जन्म मृत्यूची साखळी अन तयात गुंफली ॥६

काही कळू कळू येते काही हळू निसटते 
शून्य स्पंदाच्या शेवटी काही आत लकाकते ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...