गणेश जन्म रहस्य.
डॉ. विक्रांत तिकोणे
**************
श्री गणपतीचा जन्म श्री भगवती पार्वती मातेच्या अंगावरील मळापासून झाला आहे, असे पुराणा मध्ये लिहिले आहे .असे ऐकवून कुणी म्हणतात, की एवढा मळ मातेच्या अंगावर होता की काय ? आणि एक प्रकारची टर उडवली जाते या गोष्टीला हसले जाते. तसेच भगवान शंकरांना सर्व ज्ञानी जगतपित्याला हा आपला पुत्र आहे किंवा तो पार्वतीपासून झालेला मानसपुत्र समोर आहे हे पण कसे कळत नाही याबाबतही दुसरी शंका घेतले जाते. तिसरी शंका म्हणजे इतक्या लहान मुलाचा निर्दयपणे वध करणारा परमेश्वर भगवान कसा असू शकेल ? असे विचारले जाते. ज्या वेळेला भगवान शंकराकडून गणपतीला हत्तीचे डोके आणून लावले जाते त्या वेळी हत्तीच्या डोक्याची आणि मनुष्याच्या देहाची तुलना करूनही तिथे पुन्हा हसले जाते आणि अशाप्रकारे वरवर योग्य वाटणारे पण आत खच्चीकरण करणारे प्रश्न करून या देशातील हिंदू तरुणांचा बालकांचा बुद्धिभेद केला जातो आणि श्रद्धेला हात घातला जातो .
तर अश्या ज्या गोष्टी आहेत . हे जे तथाकथित विज्ञानावादी लोक आहेत, त्यांना हे कळत नाही (किंवा मुद्दाम नकळल्याचा आव आणून) की पुराण कथा या एक प्रकारच्या रूपक कथा असतात. त्याचे बाह्य स्वरूप वेगळे असते आणि अंतरंग वेगळे असते.
लक्षात घ्या की भगवान श्री शंकर आणि माता पार्वती यांचे संबंध हे प्रथम गुरु आणि प्रथम शिष्य असे आहे.आणि मळ म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे . भगवती माता ही आपल्या अंगावरच्या मळापासून म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या अज्ञान मळा पासून या पुत्राची निर्मिती करत आहे (आपल्या मनात प्रसवणारे विचार हे आपले पुत्रच तर असतात) म्हणजे काय तर हा अंधार अज्ञान रुपी जो पुत्र आहे जो मातेने तयार केलाय तो तिच्या न्युनामुळे निर्माण झालेला आहे आणि हा अज्ञानरूपी पुत्र तिने आपल्या दारात ठेवलेला आहे आणि ज्या वेळेला भगवान शिव तिच्या घरात प्रवेश करू पाहतात म्हणजे अंतकरणात येऊ पाहतात मनात प्रवेश करू पाहतात त्यावेळेला हा अज्ञान रुपी मुलगा त्यांना आत येवू देत नाही .त्यावेळेला तो दयाळू परम कल्याणकारी महादेव त्या अज्ञानाचा वध करतो, त्याला नष्ट करतो जेणेकरून आपली परम शिष्य भगवती माता पार्वती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल किंवा तो तिच्यापर्यंत पोहोचू शकेल ,अशी योजना ते करतात परंतु मातेचा अज्ञान जरी गेला असला परमेश्वर भेटला असला तरी मोह अजूनही गेलेला नाही, ती मोहवश आहे म्हणून तिला त्या अज्ञानातही सुख वाटत होते, आनंद होत होता. त्यासाठी तिने पुन्हा त्या अज्ञानाचा हट्ट धरला आहे अशा वेळेला तो ज्ञानी अन कणवाळू भक्त वत्सल महादेव या अज्ञानाचे रूपांतर ज्ञानामध्ये करत आहेत त्या अज्ञानापासून तयार झालेल्या पुत्राला ज्ञानामय करत आहे आणि हत्ती हे आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानाचे प्रतीक मानले गेले आहे .म्हणुनच गणपती हा बुद्धीचे प्रतीक आहे. तो सार विचार करून विवेकाने निर्णय घेतो त्याच्या त्या निर्णयाने कार्यात येणारे विघ्न आपोआप नष्ट होते . तो विघ्नांतक आहे. तो म्हणूनच सुखकर्ता आणि दुःखहर्ता आह. हे त्याचे खरे स्वरूप आहे असे मला वाटते .
अन हा या कथेतील गूढ अर्थ आहे.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘ ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा