रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

माझा गणपती महासुखराशी



महासुखराशी
**********
महासुखराशी माझा गणपती
लावण्याची मूर्ती मनोहर ॥१
पाहताच तया हृदयात प्रीती 
ओसंडून येती काठोकाठ॥२

जैसे आकाशात बिंब उगवते 
सृष्टी प्रकाशाते हर्ष भरे॥३
तया परि मन होते उल्हसित 
दंग चैतन्यात अनामिक॥४

तांबूस शेंदरी तनु ती गोजरी
तुंदील साजरी सान गोड॥५
पाश अंकुशादी आयुध हातात 
भग्न एक दात तोही शोभे॥६

वस्त्र भरजरी सर्प कटीवरी
शुर्पकर्णावरी कुंडल ती॥७
दिव्य पितांबर शेला खांद्यावर 
माळा गळाभर सुगंधित ॥८

पाहूनया मूर्ती सुखोर्मी उठती 
डोळे पाझरती आनंदाने ॥९
भाग्यवशे देसी तूच तुझी भक्ती
रुजली विक्रांती कृपा तुझी ॥१०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...