शिकारी
********
तुटलेल्या धनुष्याचा नेम सदैव चुकतो
उलटून बाण पुन्हा
मारणार्या लागतो ॥
लक्ष्य समोर दिसता
हात शिवशिवतात
शिकाऱ्याचे चित्त मग
साधना विसरतात ॥
शिकार मुळी नसते
कधीसुद्धा ती शिकार
मनाचा या मारेकरी
कुणा कसा कळणार ॥
कधी काम क्रोध मोह
कधी मद व मत्सर
अचानक येऊनिया
नाचतात उरावर ॥
शिकारी होता शिकार
उर्मी साऱ्या मिटतात
चौहाटी पडते प्रेत
गिधाडे विदारतात ॥
तुटताच धनुष्य ते
म्हणुनि जाळून टाक
शिवशिवताच हात
दत्ताची करुणा भाक॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा