रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

जीवन जरा व मृत्यू

जीवन जरा व मृत्यू 
***********
जीवन पथावर चाले म्हातारा
घट्ट चिकटला घरादारा

म्हाताऱ्याला जरी मोह न उरला
लोभही सुटला होता पूरा

परी माझेपण तयास सुटेना  
अन् सोडवेना घट्ट मुठ

थकल्या देहात तेच असे मन 
सुख कण  कण वेचणारे 

जीर्णत्वाचा हा शाप जगण्याला
का कुणी दिला कळेनाच

पान पिकूनि का हवे गळायला
वाट पहायला झडण्याची 

तया पडण्याची चिंता नव्हती 
 ठावूक होती नश्र्वरता

 पटत नव्हते तरीही पिकणे
झिजून मरणे हळूहळू 

नसे तो ययाती नसे वा गजनी
गेलेले भरुनी लोभ तृष्णी

वृथा नसावी जरा  जीवना 
शाप कारणाविना जणू की

हळूच विझावा  दिवा पेटला
प्रकाश जगाला वाटतांना 

नको तडफड नको तगमग 
नको भगभग देह मना 

डाव अखेरचा ऐसा हा घडावा 
चंद्रास्त भिडावा पहाटेला 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाप

शाप ***** निसर्गाची बरबादी  करणाऱ्या  करंट्यांच्या  त्यावर पैसा  कमावणाऱ्या  नालायकांच्या  पिढ्यानपिढ्या  जातात  नरकात एक एक झाड...