बुधवार, ३० मार्च, २०२२

भग्न अर्धनरनारीश्वर


भग्न अर्धनरनारीश्वर
***************
एक एक गाठ कटुतेची 
मारत संसार चालतो 
जणू तुटता तुटत नाही 
म्हणून संसार चालतो 

तिला नको तेच कसे 
त्याला आवडत असते 
स्वातंत्र्याचे त्याचे संकेत 
तीही चुलीत घालत असते 

तिची बडबड अखंड अशी 
त्याला अगदी वीट येतो 
त्याची संथ बेपर्वा वृत्ती 
हिचा पारा चढत असतो 

स्पर्श सुखाचे क्षणिक सोहळे 
कधीच जळून गेले असतात 
अनाकलनीय असंतोषाचे 
ढग पुनःपुन्हा जमत असतात 

स्वप्नभंग असतो का हा 
अपेक्षांची वा माती होणे ?
कोंडमारा मनात दाटला 
त्याचे असे का उफाळणे ?

भरजरी सुखाला मग त्या 
अगणित भोके पडती 
दुरून सारे छान सुंदर 
जवळ कोणा ती येऊ न देती
 
पण का तुटत नाही दार 
का तुटत नाहीत भिंती 
एकच उत्तर याचे समाज 
लोकलाज जननिंदा भीती 

तसेच तिला हे माहीत असते 
बाहेर पशु आहेत किती ते
म्हणून कष्ट नि दुर्लक्ष साहत 
सुरक्षाच ती पसंत करते 

त्याला हवी असते भाकरी 
छप्पर एक दुनिया आपली 
जगामध्ये अन दाखवायला 
झुल सुखाची खोटी घेतली  

त्याला माहित तो नच शिव 
तिला माहित ती नच शक्ती 
घरोघरी तरी बळे नांदती 
भग्न अर्ध नरनारीश्वर ती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळ्यामधले  स्वप्ना  लंघुनी स्वप्न उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  चांदण्याचे तोरण झाले ॥२ कणा...