शुक्रवार, ११ मार्च, २०२२

सुटणे

सुटणे
*****

कुणात गुंतणे 
अन् न तुटता 
हळुवार सुटणे 
हे मी तुझ्याकडून शिकलो !

त्या सुटण्यात 
तेढ नसते  
खंत नसते 
कसकस नसते 
तगमग नसते 
असते ती फक्त 
शब्दात न उतरणारे 
धन्यवाद

सुगंध उधळून 
ओघळणाऱ्या 
आकाशजाईचे
विरक्त समाधान .

अनंत जीवनाच्या
पटावरील
इवलीशी घटना 
कुणाला न कळणारी
अगणित अपूर्णतेची
एक कडी
तरीही संपूर्णतेचे
समग्र सार 
घेवून आलेली.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...