गुरुवार, ३१ मार्च, २०२२

एकांत


एकांत
*******

दिसे कल्लोळ भोवती
मज व्यर्थ जगण्याचा 
कधी भेटेल एकांत
अर्थ पूर्ण जीवनाचा.

कधी सुटेल कळेना
संग गर्द बळदांचा 
कधी होईल मी अंश
निराकार आकाशाचा

दिसे सदोदित जीव
याला त्याला बांधलेला
बंध हेच नाव काय 
असे इथे जगण्याला

हाती सोनियाची बेडी 
जरी सुंदर ती  किती
खणाखणा आदळते
माझ्या कानी पदोपदी 

आता भार होतो मना 
दुजेपणा दाटलेला
हाय परी देवे जीव
मज कळपाचा केला

पोटासाठी ओढियले
जीणे सारे कसेतरी 
सारे व्यर्थ होते जरी
मज कळे आता परी

गूढ जाणवतो मज 
एकांत तो मरणाचा 
नको हारतुरे वाटे
सन्मान या जगताचा 

इथे युद्ध द्वेष दु:ख
रक्त गंध या हवेला
वाटते मज इथे मी 
आलो उगाच जन्माला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...