माझे जगणे
*********
दरवळतो मधुमास भोवती सरता सरत नाही
हि गोडी जीवनाची या
मिटता मिटत नाही ॥१॥
ते वर्ख मनाच्या पंखाचे
दिशात फाकती दाही
रस रूप गंध टिपतांना
मी माझा राहत नाही ॥२॥
या सुखे मृदू झंकारती
मनी लक्ष लक्ष तारा
कंपणे देह मनातील
घेवून जातो वारा ॥३॥
फुलतात तराणे नुतन
होताच ऋतुंचे आगमन
हा कण कण भारावून
घेतो तया अलिंगून ॥४॥
जगण्यास भरून जे सर्व
ते सदा जाणवे स्पंदन
उरी भक्ती प्रीती होवून
शब्दांनी भरते अंगण ॥५॥
हे जगणे इतुके सुंदर की
वाटते जगास वाटावे
होवून घनगर्द निळा मी
या अणुरेणूवर बरसावे ॥६॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा