कविता दिन
**********
काय म्हणूनी कविता लिहसी ॥
मी ही सांगतो मग तयास
खरेच नाही ठावूक जीवास ॥
कधीतरी मी शब्द ऐकले
ताल सुरातील जादू भरले ॥
यमकावरती किंचित थांबून
खाली वरती आले फिरून ॥
शब्द शब्द जव उभे राहती
अनवट नक्षी दिसू लागती ॥
आणि विभ्रम भावभावना
येती जाती किती कल्पना ॥
या सार्यातच मी पण सरते
तद्रूपता मग शून्यी लागते ॥
मग ये त्यातून शब्द उसळून
किंवा हलके हलके झरून ॥
देहाचा या मी शब्दची होतो
अर्थ नवा अस्तित्वाला येतो ॥
लिहिता लिहिता घुसमट होणे
कधी हरखून हरवून जाणे ॥
हे तो असते वरदान वेगळे
मागितल्याविन पदरी पडले ॥
जीव जीवाशी केव्हा जडतो
मन मनाचे नीजगुज सांगतो ॥
कवितेतून त्या भक्ती कळते
कविता हीच रे प्रीती असते ॥
महाकवी रे जरी मी नाही
जरी चोपडी भरली वही ॥
जगण्यासाठी पूर्ण कविता
विक्रांत हा लिहितो कविता !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा