बुधवार, १६ मार्च, २०२२

खानावळ


खानावळ
*******

नोकरीची जागा 
एक खानावळ असते 
प्रत्येकाला 
इथे येऊन फक्त 
पोट भरायचे असते 

ही गोष्ट वेगळी आहे 
कोणी पोटापुरते खातो 
कोणी पोट फुटेस्तोवर खातो 
कोणी परवानगी नसूनही 
गुपचूप पिशवीत टाकतो
घरी घेऊन जातो 

कधी जेवता जेवता 
होतात काही गप्पा 
जुळतात स्वभाव  
कुणाकुणाचे 
आदान-प्रदान 
होते विचारांचे 
कुणी ताटातले काढून
देतो दुसर्‍याला 
मैत्र होते जीवांचे

तसे असतात 
काही  फायदे 
प्रत्येक जागेचे 
सगळेच आभाळ 
नसते  उन्हाचे

पण खानावळीला 
काहीच फरक पडत नाही 
त्याच ताटात 
कालच्या धुतलेल्या
आज कोणी दुसरा जेवत असतो 
आवडीचे किंवा नावडीचे 
अन्न खात असतो 
त्याला इलाज नसतो 
कारण प्रत्येकाला
खानावळीचा 
महिना भरायचा असतो 

अन मालक त्या खानावळीचा 
न दिसणारा 
अनंत काळाचा 
राबवत असतो सर्वांना 
खाणाऱ्यांना 
वाढणार्‍यांना 
चोरणार्‍यांना आणि 
भीक मागणार्‍यांनाही 

कधी वाढणारा 
खाणारा होतो 
तर कधी खाणारा 
वाढणारा होतो 
भूमिका बदलतात 
माणसं बदलतात 
खानावळ चालूच राहते 
इथे जात धर्म नसतो 
लिंग वर्ण नसतो 
असतो तो फक्त हिशोब 
पोटाचा अन बिलाचा 

अन तो
काळाचा मॅनेजर
वसूल करत असतो
बील
आयुष्य नावाचे

भरत असते पोट 
रोजचे
सरत असतात दिस
रोजचे
अन आपल्याला वाटते 
आपण जगतोय
जीवन 
विना उपासमारीचे

अश्या अनंत खानावळी
चालू आहेत
पोट भरत आहेत 
आयुष्य सरत आहेत.
उपासमारीच्या 
भयाचे भांडवल करून 

पण मालक तोच असतो .

कधीतरी संपते 
हि पंगत
कुणाला मिळतो 
पेन्शनचा डबा घरपोच 
थोडा कमी असतो 
तसे आता पचवणेही 
अवघड असते पण
आपण वेचलेल्या काळाचाच
तो मोबदला असतो.
थोडक्यात तो ही 
खानावळीचाच 
बांधील असतो.

एकदा स्वीकारली खानावळ
की दिवस मोजायचे 
अन
काळ श्रमाचे  
बील भरायाचे 
मग रिटायर होवून 
मरून जायचे .

वा रे जिंदगी विक्रांत
वा 
खरेच मस्त आहे.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...