रविवार, २० मार्च, २०२२

ती

ती
***:

भाळी मिरवते 
मोकळी ती बट 
गळा घातलेली 
नाजुकशी पोथ 

डोळीयात लोटे 
मोतियाचे तेज 
चालण्यात दिप्त
लखलखे वीज 

ओठावरी मंद 
हसू झाकलेले 
पापण्याचे मेघ 
सदा झुकलेले 

भुवयात वक्र 
धनुष्य कमान 
नासिका तशीच 
दावी भारी मान 

जरा हालताच
वाजती कंकणे 
चालतांना पथी
गूंजती पैंजने 

पांघरून स्वत्व 
चाले अग्निशिखा 
दारा बाहेरील 
पुसुनिया रेखा 

किती पराजित 
झुकल्या नजरा 
किती उभे अन
जुळवून करा 

वाट नागमोडी 
अंधारही पाठी
मुखावरी फाके
दिशा उगवती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...