मंगळवार, २२ मार्च, २०२२

उच्च पदस्थ

उच्चपदस्थ
*********

मला क्वचितच दिसतात 
ते उच्चपदस्थ 
हसतांना 
स्मित करतांना 
ते असतात सदैव 
स्थिर शांत तटस्थ 
एका सीमारेषेच्या पलीकडील
एकांत जगात

ते बसतात 
बोटात गुंफवून बोट 
ते बोलतात 
सरळ रेषेत ठेवून ओठ 
ते बोलतात 
डोळे कोरडे ठेवत
ते घालतात 
कडक इस्त्रीचे शर्ट 
अन चकाकते बूट 
ते चालतात 
ओझे घेऊन 
स्वतःच्या कामाचे 
अन शक्तिशाली पदाचे 
खोलवर बंदिस्त करून 
आपली मृदुता 

पण माणूस आहे 
म्हणजे मन असणार 
कोणावर तरी माया करणार 
कोणावर तरी झुरणार 
कोणावर तरी रुसणार 
काळजी घेणार 

तेव्हा कळतं की 
त्या हसण्याने तयार होते 
केवढी मोठी भिंत 
पण जिथे सत्ता असते 
तिथे प्रवेश करायला 
अनेक उत्सुक असतात
ते घुटमळणारे 
संधी शोधणारे 
कार्यभाग साधणारे 
धूर्त हुशार महाभाग 
त्यांना दूर ठेवण्यासाठी
आवश्यकही असेल ते न हसणे

 कारण हसणे हे असते 
एक स्वागत 
एक किलकिलणारा 
आतून 
उघडणारा दरवाजा 
प्रवेशाची संधी देणारा 

पण खरोखर हें न हसणे 
ही केवढी मोठी किंमत आहे 
स्वतः होणारे 
इंडॉर्फिन जाळून जगणे 
खुर्ची आणि पदासाठी 
अनंत सौख्यांना 
ओवाळून टाकणे
हे एक प्रकारचे बलिदान असते 
जे क्वचित कोणाला कळते 

कोणाच्याही जीवनातील 
सामान्यत्व 
ही सर्वात मौल्यवान गोष्ट असते 
ती गोष्ट हरवणे गमावणे 
यासारखे शल्य नसते 

म्हणून  या न हसणाऱ्या 
तटस्थ राहणाऱ्या 
ओरडणाऱ्या उच्चपदस्थांबदल
मला कणव वाटते
अन मी मनोमन त्यांना सलामही करतो 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...