गंभीर. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गंभीर. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३० मार्च, २०२२

भग्न अर्धनरनारीश्वर


भग्न अर्धनरनारीश्वर
***************
एक एक गाठ कटुतेची 
मारत संसार चालतो 
जणू तुटता तुटत नाही 
म्हणून संसार चालतो 

तिला नको तेच कसे 
त्याला आवडत असते 
स्वातंत्र्याचे त्याचे संकेत 
तीही चुलीत घालत असते 

तिची बडबड अखंड अशी 
त्याला अगदी वीट येतो 
त्याची संथ बेपर्वा वृत्ती 
हिचा पारा चढत असतो 

स्पर्श सुखाचे क्षणिक सोहळे 
कधीच जळून गेले असतात 
अनाकलनीय असंतोषाचे 
ढग पुनःपुन्हा जमत असतात 

स्वप्नभंग असतो का हा 
अपेक्षांची वा माती होणे ?
कोंडमारा मनात दाटला 
त्याचे असे का उफाळणे ?

भरजरी सुखाला मग त्या 
अगणित भोके पडती 
दुरून सारे छान सुंदर 
जवळ कोणा ती येऊ न देती
 
पण का तुटत नाही दार 
का तुटत नाहीत भिंती 
एकच उत्तर याचे समाज 
लोकलाज जननिंदा भीती 

तसेच तिला हे माहीत असते 
बाहेर पशु आहेत किती ते
म्हणून कष्ट नि दुर्लक्ष साहत 
सुरक्षाच ती पसंत करते 

त्याला हवी असते भाकरी 
छप्पर एक दुनिया आपली 
जगामध्ये अन दाखवायला 
झुल सुखाची खोटी घेतली  

त्याला माहित तो नच शिव 
तिला माहित ती नच शक्ती 
घरोघरी तरी बळे नांदती 
भग्न अर्ध नरनारीश्वर ती

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

घोट आसवांचे.

घोट
*****

घोट मी घेतो आसवांचे 
बोल मी हे ऐकतो कुणाचे 
खरोखर मज हसू येते 
काय हे रे कौतुक स्वतःचे 

करती जे प्रदर्शन दुःखाचे 
त्यात महत्त्व नसते तयाचे 
"मी" भोगले रे दुःख एवढे 
छूपे दर्शन घडते याचे 

घोट घोट प्यायला इथे 
आसू काय लिम्का असे 
अन काढा पाटणकरांचा 
गोष्ट घोट घोटा ची नसे 

घोट घोट उगाळीत कुणी 
दुःख जेव्हा सांगू लागतो 
करा बहाना घाला चपला
मित्रत्वाने तुम्हास सांगतो 

त्या साल्याचा इगो फुगतो 
अन् ताप आपल्याला होतो 
अरे त्याहून बरा असे तो  
दुःखाला जो शिव्या देतो 

सुख हवे तुज दुःख नको 
असे कधीच होत नसते
एका घोटात दुःख प्यायचे
पुन्हा उभे राहायचे असते 

आणिक जे सिनिक रुग्ण
ज्याना रडणे हवे असते 
त्यांना त्यांच्या मुर्खपणात 
सरळ सोडून द्यायचे असते 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

पालखी

पालखी  *** दत्त कुणा भेटतो का  भेटतो वा साईनाथ  वाहूनिया पालखीला  चालूनिया घाट वाट दत्त कुणा कळतो का  करूनिया थाटमाट सुटते का अं...