रविवार, ४ ऑक्टोबर, २०२६

द्वेष

द्वेष 
****
मुळात माणसे द्वेष का करतात?
द्वेष करणे ही मनाची 
माणसाची गरज आहे का?
हा माणसाच्या मनाचा 
अविभाज्य भाग आहे का?
द्वेष केल्याने नेमकं काय मिळतं?

द्वेष एका कळपाला वाटणारी 
भीती असते का?
द्वेष ही मानसिक स्तरावरील 
हिंसा नसते का?

आणि हिंसा व भीती मधून कधी
सृजनता निर्माण होत असते का?

द्वेष हा वैर आणि मत्सर यांचा 
सख्खा भाऊच आहे, होय ना?

आम्हाला भीती वाटते 
त्यांच्या सामर्थ्याची 
त्यांच्या पैशाची 
किंवा त्यांच्या संख्याबळाची.
कारण आम्हाला माहीत आहे 
या जगाची नीती 
बळी तो कान पिळी 
होय ना?

आमच्या मनात धुमसत असते 
ती कटू भावना
मागे कधीतरी बळी कडून 
दडपले गेल्याची 
वाट्याला आलेल्या निकृष्ट
भूमिकेची
आणि पुन्हा बळीपुढे 
चिरडले जाण्याची भीतीची.
होय ना?

होय ती शक्यता नाकारता येत नाही. 
पण त्यासाठी द्वेष करून 
भीतीत दडून 
मत्सरात उबगून 
राहायची काय गरज आहे. 

आज आमच्यात सामर्थ्य आहे 
एकीचे बळ आहे 
ज्ञानाचे शिक्षणाचे नेत्र आहेत. 

आणि असे मुठभर कट करणारे 
संकुचित लोक तर 
साऱ्याच गटात साऱ्याच कळपात 
साऱ्यात समाजात असतात. 
ते ओढून असतात 
स्वार्थाचं कातड स्वतःच्या डोळ्यावर.
अन् घालतात खतपाणी द्वेषाला.

एवढे जरी समजले तरी पुरे .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भ्रमर-कीटक न्याय

भ्रमर-कीटक न्याय ******** बळे दत्तात्रेय केला मी सोयरा  जनी मिरवला  भाव उगा ॥१ बळे दत्तात्रेय मनिले दैवत  रंगलो भक्तीत  नाट्य पू...