गुरुवार, २ एप्रिल, २०२०

माझा राम



माझा राम
********

माझा राम
मला भेटतो कधी
रूग्णांच्या डोळ्यात
माझी वाट पाहत
बसलेला
असतो तो
तासन्तास रांगेत
उभा थकलेला .
दोन गोड शब्दासाठी
सदैव आसुसलेला
कफ सिरप मागताना
उगाचच ओशाळलेला

माझा राम
मला भेटतो कधी
नर्मदेच्या काठावरती
रुक्ष कठोर डोळ्यातला
अभिमानी गांजलेला .
दारिद्रयातील जगण्याला
सहजच सरावलेला

माझा राम
मला भेटतो कधी
माझ्या दारावरती
भिक्षेसाठी थांबलेला
आशीर्वादाची झोळी घेऊन
याचक झालेला

माझा राम
शब्दात थांबायला
नाही सांगत मला
माझा राम
मंदिरात जायला
नाही सांगत  मला

माझ्या रामाला
पारायण कथा संकीर्तन
घंटानाद करणं
नाही पसंत एवढं

माझा राम असतो
सदैव खुश
संगत नसलेला
एकांतात
मध्यरात्री
पंख्याच्या आवाजात
कवितेत उतरत

वा रस्त्यावर पडणार्‍या
आषाढ सरीतील नर्तनात
 माझ्यासवे गात

झाडातला राम
माणसातला राम
वार्‍यातला राम
पावसातला राम
असतो सदैव सांगत
पाहायला  मला
माझ्यातला
राम !

 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
https://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...