सोमवार, २० एप्रिल, २०२०

खुणगाठ



खुणगाठ
*****

माझ्या मनाला
मिळे खुणगाठ
सरू आली वाट
माझी आता ॥

जन्ममरणांचा
सुटू आला गुंता
दत्ताचिया पंथा
चालू जाता ॥

सुटू सुटू आले
हे ऋणानुबंध
असंख्य संबंध
पडलेले ॥

झाले देणे घेणे
जमा शून्या खाती
कर्माची वाहती
गती मंद ॥

जाहलो लाकूड
शुष्क वाळलेले
धुनीशी ठेविले
तयारीत ॥

अवघा पसारा
वाहणारा वारा
तयात धुरळा
विक्रांत हा ॥
***
©®डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...