गोवा
****
शोध सुखाचा गेला दूरवरअपार सागर करीत पार
खूप उसळल्या लाटा लाटावर
फेस उधळला किनाऱ्यावर
देह भिजला नखशिखात
पाणी गेले खारे डोळ्यात
कुठले बाहेर कुठले आत
कळले नाही असता वाहत
माड हसले हसली माती
मृत शिंपले वाळू वरती
हा हा हा ची गाज भोवती
फेर धरून नाचत होती
मी पण माझे स्तब्ध जळात
हलल्या वाचून होते पाहत
आणि रक्तीम दूर क्षितिजात
सूर्य हरवला गर्द धुक्यात
शोध सुखाचा खोल रुतला
पाण्यावरती उगा नाचला
आणि स्मृतीच्या डोहामधला
जुनाच शिंपला हाती आला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️