रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

जमाली जादू






लाल लाल बूढीके बाल
गल्लीत ओरडत येई जमाल

यंत्र जादुई गरगरणारे
घेवून पाठी भले थोरले

खुळखुळणारा खिसा चिल्लर
इवली पिशवी भरली साखर

टोपी लुंगी वहाण तुटले
दाढीत काही केस पिकले

आमच्यासाठी परी जगातले
आश्चर्य त्याच्या यंत्री भरले

लावूनी काडी पॅड्डल मारी
मधुकणिकेची होई जाळी

गुंडाळून मग ती तो हळुवार
कापूस गोळा देई गुलजार

दहा पैशात दहा मिनिटांत
स्वारी जाई जणू स्वर्गात

गोड बोल त्याचे हसरे
शब्द मराठी हिंदीत बांधले

आवो बच्चे खावो भरभर
ढग गुलाबी हो गयी शक्कर


त्या गोळ्याची चव आजवर
रेंगाळते त्या बाल जीभेवर
  
हळू विरघळणारी रेष मधुर
जमा होते अन ओठ कडावर

नंतरही मग खाल्ल्या भरपूर
शुगर केंड्या कुठे मॉलवर

पण जमाली जादू कधीही
जमली नाही कुण्या काडीवर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...