शनिवार, १८ मार्च, २०१७

माझी कविता







माझी कविता 

तू कविता होतीस माझी 
आताही तूच ते गीत आहे
छंद भरल्या शब्दात माझ्या 
प्राण उजळून गात आहे 

हे भेटणे तर एक बहाणा 
तू कधीचीच अंतरात आहे
किती युगे झाली तुटून
आठव सुंगधी वाहत आहे 

ओढ जीवाला होती तेव्हा 
तीच आज उसळत आहे 
येशील तू न येशील ओठात
मूर्ती तुझी मनमंदिरात आहे

अर्थहीन आयुष्याची जरी
पोकळी जीवनात आहे 
दिसतेस तू क्षितिजावरती
वाटते सुखाची बात आहे 

जगलो जरी तुझ्याच साठी
अजून लालसा मनात आहे
तुझी अबोल भिडस्त भाषा 
लाख शब्दांची बरसात आहे ।

श्रीमह्नमंगले शारदे वाग्देवते 
तव कृपा उज्वल पहाट आहे 
अंधारल्या जीवनाचा माझा 
हा किती सुंदर शेवट आहे 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...