गुरुवार, २३ मार्च, २०१७

अमावस्या पांघरून




अमावस्या पांघरून
उगवतो चंद्र कधी
असूनही नभांगणी
दृष्टी येत नाही कधी ||

अशी प्रीत नशिबात
येवू नाही कुणा कधी
मिटूनही अस्तित्वाला
थांग लागतो ना कधी ||

लाख स्वीकारतो जन्म
मन स्वीकारत नाही
जळूनिया जाते जग
कुणा कळतच नाही ||

हासुनिया मिरवता
शब्द सजतात जरी
कुणाविना जगतांना
शर घुसतात उरी ||

उधळल्या कुसुमांना
झेलण्यास गेलो कधी 
पावसात निखाऱ्याच्या
ब्र ही मुखी न ये कधी ||
 
पथावरी आखलेल्या
जीवनाचे गाडे चाले
कुणा इथे फुरसत
कोण कुणाविना गेले ||

ताटव्यात गुलाबाच्या
कुणीतरी मग्न आहे
भुरळतो वाटसरू
थोडे डोकावण आहे ||

चला नसे हे ही थोडे
गंध गुलाबाचा आला
पाया खाली काटे तरी
जन्म फुकट न गेला ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...