सोमवार, १३ मार्च, २०१७

खुळा बहाणा









खुळा बहाणा

खुळ्या जगण्याचा
खुळाच बहाणा
हरवल्या मना  
मार्ग नाही ||

रोज धडपड
तीच गडबड
जीवा लागे गोड
घोर ऐसा ||

दूर जावू जाता
अडविती वाटा
घुसलेला काटा
काळजात ||

जरी चित्त सारे
मुग्ध वादळात  
प्राणाचा शेवट
हवा वाटे ||

खोटे वाटे जग
ऐसी तगमग
अंतरात आग
पेटलेली ||

पेटवला चूड
जाळो देह मना
एवढी कामना
पूर्ण व्हावी ||

विक्रांत भिजून
उजाड वावर
फाटण्यास उर
सज्ज दत्ता ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...